लोकसभा निवडणूक लढण्यासाठी नागरिकाला कोणत्याही सांपत्तिक किंवा शैक्षणिक पात्रतेची ज्याप्रमाणे अट नाही तशीच वयाची किमान मर्यादा असली तरी उमेदवारांसाठी कमाल मर्यादा नसल्यामुळे वयाची ७५-८० वष्रे पार केली तरी लोकसभा निवडणुकीच्या रणांगणात तरुणांना लाजवणाऱ्या उत्साहाने लढत असलेले १६ उमेदवार राज्यात आहेत. यापकी बऱ्याच जणांचे आयुष्य राजकारणातच गेलेले आहे. ज्यांनी राजकारणाचे उन्हाळे पावसाळे पाहिले नाहीत किंवा राजकारणाची अबकडही माहिती नाही असे पंचविशीतील तब्बल १२ उमेदवार निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर उतरले आहेत. त्यात तीन तरुणींचाही समावेश आहे.
विशेष हे की, नंदूरबार मतदारसंघातून ९ वेळा लोकसभेत गेलेले आणि केंद्रात दोनदा मंत्री राहिलेले काँग्रेसचे ८१ वर्षीय माणिकराव गावित यांच्याविरोधात त्यांचीच नात डॉ.हिना विजयराव गावित ही २६ वर्षीय तरुणी भाजपकडून लढत आहे. अहमदनगर मतदारसंघातून न्या. बी.जी. कोळसे पाटील पंचाहत्तरीत प्रवेश करीत असतांना स्वतंत्रपणे लढत आहेत. विदर्भातील साकोलीचे धनंजय श्यामलाल राजभोज हे तर वयाच्या ८७ व्या वर्षांच्या उंबरठय़ावर उभे असून भंडारा-गोंदिया मतदारसंघात स्वतंत्रपणे उभे आहेत. एम.कॉम. एल.एल.बी असलेले राजभोज यांचा उत्साहही वाखाणण्यासारखाच आहे.
याच मतदारसंघात लाखनीचा विलास भोयर हा २६ वर्षीय अभियंता उभा आहे. बुलढाणा मतदारसंघात काळू गणपत चिंचोले हे ७३ वर्षीय गृहस्थ स्वतंत्रपणे लढत आहेत. दोनदा खासदार आणि पाचदा आमदार राहिलेले आणि दोनदा अनामत रक्कम जप्त झाल्याचा अनुभव घेतलेले विदर्भवीर असा एकेकाळी लौकीक मिळवलेले बी.ए. नापास जांबुवंतराव धोटे वयाच्या ७८ व्या वर्षी भरउन्हात मतांचा जोगवा मागत फिरले आहेत.
विदर्भातील वर्धा मतदारसंघात संजयभाऊ सिडाम हे ८१ वर्षीय गृहस्थ मदानात आहेत. राजकारणात उभे आयुष्य घालवलेले पदमसिंह पाटील हेही पंचाहत्तरीच्या उंबरठय़ावर असतांना राष्ट्रवादीच्या तिकिटावर उस्मानाबाद मतदारसंघातून नशीब अजमावत आहेत.
पुणे मतदारसंघात तर सुरेश पाटील आणि जयंत चितळे हे दोन सेवानिवृत्त कर्नल वयाच्या ६८ व्या वर्षी दिल्लीवारीसाठी नशीब अजमावत आहेत. भिवंडी मतदारसंघात आठवी पास असलेला २६ वर्षीय योगेश काठोरे हा तरुण भारिप-बहुजन महासंघातर्फे, तर यशवंत बिर्जे (७२), रघुनाथ मकसरे (७१),केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे (७४), एस.आर. पाटील (७९), जाफरअली पठाण (७३) हे अनुक्रमे रत्नागिरी-सिंधूदुर्ग, शिर्डी, हातकणंगले व नांदेड मतदारसंघातून लढत आहेत.
सानिया कादरी व रक्षा खडसे या २५ वर्षीय दोन तरुणी व मणियार कादर (२६) हा तरुण रावेर या एकाच मतदारसंघातून लढत आहेत, तर सागर कदम आणि उमेश वाघमारे हे दोघे २६ वर्षीय तरुण साताऱ्यातून स्वतंत्रपणे आणि विकास कुसकेर हा २६ वर्षांचा तरुण शिरूर मतदारसंघात फॉरवर्ड ब्लॉकच्या तिकिटावर लढत आहे. जळगाव मतदारसंघात आठवी पास २७ वर्षीय अबरार बेग आणि बारावी पास २५ वर्षीय विजय निकम हे दोघे लढत आहेत. शिवसेनेने २७ वर्षीय डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे (एमबीबीएस) या तरुणाला कल्याण मतदारसंघात संधी दिली आहे. राजकारणात हयात घालवलेले दहावी पास विजयसिंह मोहिते पाटील वयाच्या ७० व्या वर्षी घडय़ाळ चिन्हावर माढामधून लढत आहेत.
सेनेचे माजी मंत्री गजानन किर्तीकर, कांॅग्रेसचे एकनाथ गायकवाड हे दोन्ही ७० वर्षीय उमेदवार मुंबईतून लढत आहेत, तर गणेश बुधे (७५) हे स्वतंत्रपणे लढा देत आहेत. श्रीकांत गडले (२७) हा दहावी पास तरुण शेतकरी बीडमधून लढत आहे. इचलकरंजीचे दहावी पास कलप्पा आवाडे हे ८३ वर्षीय नेते काँग्रेसच्या पंजावर हातकणंगले मतदारसंघातून लढत आहेत.
पंचविशीतील तरुण आणि ऐंशीचा उंबरठा ओलांडलेले ‘भीष्माचार्य’ही
लोकसभा निवडणूक लढण्यासाठी नागरिकाला कोणत्याही सांपत्तिक किंवा शैक्षणिक पात्रतेची ज्याप्रमाणे अट नाही तशीच वयाची किमान मर्यादा असली तरी
First published on: 26-04-2014 at 04:01 IST
TOPICSलोकसभाLoksabhaलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Electionलोकसभा पोल २०२४Lok Sabha Pollsसंसदीय निवडणुकाParliament Election
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 16 candidates in maharashtra aged between 75 80 contest lok sabha election