डेपो इतरत्र हलविण्यासंदर्भात वारंवार नोटीस देऊनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या आणि प्रदूषणात भर घालणाऱ्या १६ कोल डेपोंना आज जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये सील ठोकण्यात आले. चार तहसीलदारांनी संयुक्तपणे केलेल्या या कारवाईत दोन कोटी रुपयांचा ६०० टन कोळसा जप्त करण्यात आल्याने कोल व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
 चंद्रपूर-नागपूर महामार्गावर लखमापूर पासून ते पडोली गावापर्यंत कोल व्यावसायिकांचे साम्राज्य आहे. कोल डेपोत कोळसा भरून ठेवणे आणि विक्री करणे हा त्यांचा प्रमुख व्यवसाय आहे. परंतु या कोळशामुळे या परिसरातील तसेच चंद्रपूर शहरालगतचे वातावरण प्रदूषित झाले आहे. पावसाळय़ाच्या दिवसात तर कोळसायुक्त पाणी थेट इरई नदीच्या पात्रात जात असल्याने लोकांना असंख्य आजाराने ग्रासले आहे. तसेच श्वसन, त्वचा, केस गळती व इतर आजाराचे प्रमाणही बळावले आहे. या डेपोंमुळे लखमापूर ते मोरवा गावापर्यंत वातावरणात कायम धूळ असते. त्याचाही परिणाम परिसरातील गावातील लोकांच्या आरोग्यावर झालेला आहे. शहराच्या अगदी प्रवेश व्दारावरच कोल डेपोचे प्रदूषण असल्याने हे ३७ कोल डेपो इतरत्र हलविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विजय वाघमारे यांनी कोळसा व्यापाऱ्यांची बैठक घेऊन दिले होते. मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशाकडे कोळसा व्यावसायिकांनी साफ दुर्लक्ष केले. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी तेव्हा ३७ डेपो संचालकांवर कारवाई केली होती. त्यामुळे यातील तीन ते चार डेपो संचालकांनी इतरत्र जागा घेऊन तिथे कोल डेपो सुरू केले तर ३० डेपो व्यावसायिकांनी न्यायालयाात धाव घेतली. यावर न्यायालयाने केवळ कोल डेपोतील कोळसा तातडीने उचलून घ्यावा, असे निर्देश दिले. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी या सर्व डेपो संचालकांना फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवडय़ापर्यंत डेपो हलविण्याची मुदत दिली होती. फेब्रुवारी व मार्च निघून गेल्यानंतरही कोळसा व्यावसायिक डेपो हलवित नसल्याचे बघून जिल्हाधिकारी विजय वाघमारे यांनी गुरुवारी १६ कोल डेपो सील करण्याचे निर्देश दिले. जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश मिळताच तहसीलदार शिंदे, संतोष खांडरे, पडोले व चव्हाण यांच्या संयुक्त पथकाने डेपोंवर छापा मारून सर्व १६ कोल डेपोंना सील ठोकले आहे. यामध्ये रफीकभाई मालपानी, बजरंग अग्रवाल, विनय जैन, सुरेश अग्रवाल, संजय खंडेलवाल, साजन अग्रवाल, रामविलास मित्तल, राजीव जैन, राजेंद्र सिंग, रघुनाथ मुंधडा, प्रकाश अग्रवाल, पी.एन.जोशी, नवीन व कैलास अग्रवाल तसेच ओटीएस कंपनीच्या कोल डेपोंचा समावेश आहे. सीलबंद केलेल्या या सर्व डेपोंमध्ये ६०० टन कोळसा असून त्याची किंमत दोन कोटीच्या घरात असल्याची माहिती तलाठी प्रभावत यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली. यामध्ये सर्वाधिक १४ कोल डेपो लखमापूर गावातील असून एक पडोली व एक खुटाळा येथील आहे. विशेष म्हणजे न्यायालयाने या सर्व कोल डेपो संचालकांना डेपोतील कोळसा तातडीने उचलण्याचे निर्देश दिले होते. न्यायालयाच्या निर्देशानंतरही कोळसा उचलण्यात आलेला नव्हता. त्यामुळे आता कारवाई करताना ६०० टन कोळसा जप्त करण्यात आलेला आहे. सोळा डेपो संचालकांना ताडाळी ग्रोथ सेंटर व नागाळा येथे जागा उपलब्ध करून दिलेली आहे. काहींना उमरी रिठ येथे जागा दिली आहे. अशाही परिस्थितीत डेपो तेथे न हलविता शहर व गावांच्या प्रदूषणात भर घालत असल्यानेच ही कारवाई करण्यात आली आहे. सायंकाळी उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती.

Story img Loader