शहरातील विविध मिळकतींवर उभारण्यात आलेल्या मोबाईल टॉवरवर कारवाई सुरू होताच मोबाईल कंपन्यांनी थकित मिळकत कर भरायला सुरुवात केली असून या वसुली मोहिमेत आतापर्यंत १६ कोटी आठ लाख रुपये इतका कर वसूल करण्यात आला आहे.
महापालिकेचे कर आकारणी व कर संकलन प्रमुख, उपायुक्त हेमंत निकम यांनी मंगळवारी ही माहिती दिली. पुणे शहरात मोबाईल कंपन्यांनी अनेक इमारतींवर मोबाईल टॉवर उभारले आहेत. मात्र, ज्या मिळकतींवर हे टॉवर उभारण्यात आले आहेत, त्यातील अनेक मिळकतींचा कर कंपन्यांनी भरलेला नाही. या थकित रकमेच्या वसुलीसाठी गेल्या महिन्यात कंपन्यांची मुख्य कार्यालये सील करण्याची कारवाई महापालिकेच्या मिळकत कर विभागाने केली होती.
या कारवाईमुळे अखेर मोबाईल कंपन्यांनी थकित रकमा भरायला सुरुवात केली असून ही मोहीम पुढेही सुरू राहणार आहे. निकम यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या वसुली मोहिमेत सहायक कर आकारणी प्रमुख दयानंद सोनकांबळे, वैभव कडलख, विभागीय निरीक्षक तारू, सुतार, भिंगारदिवे, शिवले, शिंदे, जगताप, आमले, मुंगसे, कामठे तसेच पेठ निरीक्षकांनी भाग घेतला. या कारवाईनंतर इंडस टॉवर्स (व्होडाफोन, बीपीएल, हचसन्स, भारती एअरटेल) यांच्याकडून सात कोटी ३८ लाखांची वसुली करण्यात आली असून टाटा इंडिकॉम मोबाईल टॉवर्स (क्यूपो, टाटा टेली सव्र्हिसेस, हजेस टेलिकॉम, ट्वेन्टिफर्स्ट सेंच्युरी) कडून पाच कोटी ७४ लाखांची वसुली केल्याचे निकम यांनी सांगितले. रिलायन्स मोबाईल टॉवर्स यांच्याकडून दीड कोटी रुपये वसूल करण्यात आले असून टॉवर व्हीजनकडून एक कोटी ४४ लाखांची वसुली करण्यात आली आहे. चार कंपन्यांवरील या कारवाईत १६ कोटी आठ लाख ४१ हजार रुपये वसूल करण्यात आले आहेत. विजया राठोड यांनी या संपूर्ण शहरातील टॉवर्स व थकित रकमा यांचे एकत्रीकरण केल्यामुळे ही रक्कम वसूल झाली.
दोन टक्के दंडाची वसुली
शहरातील ज्या मिळकतधारकांनी सन १२-१३ या वर्षांचा मिळकत कर अद्याप भरलेला नाही त्यांना १ जानेवारीपासून दुसऱ्या सहामाहीवर (थकबाकी असल्यास त्यासह) प्रतिमहिना दोन टक्के दंड आकारण्यात येणार असल्याचेही निकम यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा