मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दुष्काळ परिस्थिती गांभीर्याने घेऊन सातारा जिल्’ाातील दुष्काळासह विविध विकासकामांना समाधानकारक निधी दिला असून, त्यात कराड तालुक्यात १६ ‘पृथ्वी’ बंधारे बांधण्याच्या महत्त्वपूर्ण कामाला मंजुरी मिळाली असल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. युवानेते राहुल चव्हाण, विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, मनोहर शिंदे, अविनाश नलवडे यांच्यासह प्रमुख कार्यकत्रे उपस्थित होते.
पाटील म्हणाले, की कराड तालुक्यातील मसूर, चोरे परिसर दुष्काळाने होरपळून निघत असल्याने या भागातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघावा म्हणून खटाव, माणच्या धर्तीवर कराड उत्तरमधील १६ गावांमध्ये साखळी ‘पृथ्वी’ सिमेंट बंधाऱ्यासाठी मुख्यमंत्र्यांनी तब्बल १६ कोटींचा निधी मंजूर आहे. याशिवाय कराडमधील प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालयाचा विस्तार तसेच अन्य विकासकामांसाठी मिळून एकंदर सुमारे ७६ कोटींचा निधी मंजूर करण्यात सातारा जिल्हा दुष्काळाने होरपळून निघत आहे. कराड तालुका सधन समजला जात असला तरी आज तालुक्यातील मसूर परिसरातील किवळसारख्या गावास टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. याशिवाय चोरे परिसरातील गावातही टंचाईसदृश स्थिती आहे. ही वस्तुस्थिती मसूर व चोरे परिसरातील कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिली. यावर आनंदराव पाटील, राहुल चव्हाण यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांनी याबाबत पाठपुरावा करत दुष्काळी स्थिती असणाऱ्या गावांची कृषी अधिकाऱ्यांसमवेत पाहणी करून अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आला होता.
या अहवालाचा विचार करून कराड तालुक्यातील चिखली, किवळ, खोडजाईवाडी, शामगाव, रिसवड, अंतवडी, निगडी, पाडळी, घोलपवाडी, गायकवाडवाडी, चोरे, चोरजवाडी, कोरिवळे, मरळी, धावरवाडी व गोसावीवाडी या १६ गावांमधील सिमेंट बंधाऱ्यांसाठी १६ कोटींचा निधी मंजूर केला गेला आहे. त्याप्रमाणे प्रत्येक गावासाठी स्वतंत्र प्रस्ताव सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याचे आनंदराव पाटील यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच जिल्’ाातील कायम दुष्काळी खटाव व माण तालुक्यासाठी अशा प्रकारे सिमेंट बंधारे बांधण्याचा पायलट प्रोजेक्ट मंजूर केला आहे. कराड तालुक्यातील कायमस्वरूपी पाण्यापासून वंचित असणाऱ्या परिसरासह १६ गावांमध्ये अशा प्रकारचे बंधारे होणार असल्याने या गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघणार आहे. या बंधाऱ्यांना जनतेने आणि कार्यकर्त्यांनी ‘पृथ्वी’ बंधारे संबोधण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.
कराडचे तहसील कार्यालय असणाऱ्या ठिकाणी प्रशासकीय कार्यालय इमारतीसाठी १७ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तर, सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या विस्तारासाठी इमारतीस ७ कोटी ८२ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. वरील दोन्ही कामांसाठी प्रत्येकी ४ कोटी ३५ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय सुपने-किरपे दरम्यान, कोयना नदीवरील पुलासाठी १३ कोटी २ लाख रुपये, कराडच्या शासकीय विश्रामगृहासाठी २० कोटी २२ लाख रुपये, वाठार ते रेठरे दरम्यानच्या मार्गासाठी १ कोटी आणि कराड-चिपळूण मार्गापासून नव्याने होणाऱ्या किरपे-सुपने पुलाला जोडणाऱ्या मार्गासाठी ७५ लाखांची तरतूद करण्यात आली असल्याचे आनंदराव पाटील यांनी सांगितले.
कोरेगाव तालुक्याचाही प्रस्ताव
माण, खटावनंतर कराड तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती असणाऱ्या गावांमध्ये पृथ्वी बंधारे मंजूर झाले आहेत. याचबरोबर कोरेगाव तालुक्यातील रायगाव, कण्हेर खेड, नागझरी, आर्वी, साठेवाडी, मोहितेवाडी, आंभेरी, न्हावी बुद्रुक, वेळू, बेलेवाडी, वेलग, जायगावसह अन्य काही गावांचे प्रस्ताव कृषी विभागामार्फत शासनाकडे सादर करण्यात आल्याची माहितीही पत्रकार परिषदेत देण्यात येऊन या प्रस्तावाबाबतही पाठपुरावा सुरू आहे. या गावांना लवकरच निधी मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Story img Loader