जिल्ह्य़ातील पोलीस विभागांतर्गत रिक्त असलेल्या एकूण १०५ पदांसाठी १३ ते ३० मे या कालावधीत जम्बो भरती प्रक्रिया राबवली जात आहे. दोन दिवसात सुमारे १६२ उमेदवार वेगवेगळ्या कारणांसाठी अपात्र ठरले आहेत.
जागा कमी अन् उमेदवारांचे अर्ज जास्त, असा प्रकार या भरतीतही अनुभवाला येत असून एकूण जागांच्या तब्बल ४० पट म्हणजे ४८२२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. मंगळवारी सकाळी ५ वाजता भरती प्रक्रियेला प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी ८०० उमेदवारांना बोलावण्यात आले होते. त्यातील ५९२ उमेदवारांनी हजेरी लावली, तर २०८ उमेदवार गैरहजर होते. भरती प्रक्रियेदरम्यान कागदपत्रे, छाती, उंची व अन्य शारीरिक चाचण्यात ९७ उमेदवार अपात्र ठरविण्यात आले असून उर्वरित उमेदवार पुढील चाचण्यांसाठी पात्र ठरले आहेत. बुधवार १४ मे रोजी ५१२ उमेदवारांनी हजेरी लावली. उर्वरित उमेदवारांची १०० मीटर धावणे, लांब उडी, गोळाफेक आदी चाचण्या घेण्यात आल्या. त्यातील ७१ उमेदवार वेगवेगळ्या कारणांनी अपात्र ठरले आहेत.
राज्यात बेरोजगारांची फौज दिवसेंदिवस वाढत असतानाच गृह विभागाच्या वतीने राज्यभर रिक्तपदांसाठी जम्बो भरती प्रक्रिया सुरू केली आहे. चंद्रपूर जिल्ह्य़ातील १०५ जागांसाठी ३७६० युवक आणि १०६२ युवतींनी (एकूण ४८२२ उमेदवार) अर्ज दाखल केले आहेत. चंद्रपूर जिल्ह्य़ात पारा ४५ अंश सेल्सिअसवर पोहोचला असताना भरती प्रक्रिया पुढे ढकलावी, अशी मागणी करण्यात आली होती. परंतु, भरतीसाठी येणाऱ्या उमेदवाराला उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून पोलीस विभागाच्या वतीने उपाययोजना करण्यात आल्या असून पहाटे ५ ते १०.३० वाजेपर्यंत व सायंकाळी ४.४५ नंतर भरती प्रक्रियेला सुरूवात करण्यात येत आहे. तसेच धावण्याची चाचणी उन्ह तापण्यापूर्वीच आटोपली जाते.
भरतीसाठी आलेल्या उमेदवारांची चांगली व्यवस्था करण्याच्या दृष्टीने पोलीस विभाग सज्ज असून जिल्हा पोलीस अधीक्षक राजीव जैन व अन्य अधिकारी व्यवस्थेवर लक्ष ठेवत असल्याची माहिती उपपोलीस अधीक्षक (गृह) श्रीराम तोडासे यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 162 candidates ineligible in police recruitment process
Show comments