उत्तराखंडातील जलआपत्तीत बेपत्ता झालेल्या भाविकांच्या कुटुंबीयांना मदत देण्याबाबत आवश्यक कार्यवाहीची पूर्तता केली जाणार असल्याने बेपत्ता कुटुंबीयांची माहिती कागदपत्रांसह दाखल करण्याचे आदेश राज्य सरकारने विभागीय महसूल आयुक्त कार्यालयांना दिले आहेत. या दुर्घटनेत राज्यभरातील १६४ भाविक अजूनही बेपत्ता आहेत.
उत्तराखंडमध्ये गेल्या जुलै महिन्यात अतिवृष्टी होऊन पूर परिस्थितीच्या आपत्तीत राज्याच्या विविध भागांतील सुमारे १६४ भाविक बेपत्ता झाले. नागपूर ३७, पुणे २५, औरंगाबाद १३, बीड १२, लातूर ६, बुलढाणा, गोंदिया, जळगाव प्रत्येकी १, हिंगोली ६, जालना ९, नांदेड ४, नाशिक २, परभणी २१, सातारा ३, ठाणे ८, वर्धा ६ अशा ठिकाणच्या भाविकांचा यात समावेश आहे. बेपत्ता भाविकांना मदत देण्याचा उत्तराखंडातील सरकारने निर्णय घेतला असून त्यांनी महाराष्ट्र सरकारला तसे कळविले आहे. त्यामुळे राज्य सरकारने या साठी सचिव अशोक अतराम यांची नियुक्ती केली आहे. बेपत्ता भाविकांचे मृत्यू प्रमाणपत्र व इतर महत्त्वाच्या कागदपत्रांसह माहिती पाठविण्याच्या सूचना आयुक्तांनी जिल्हा प्रशासनाला केल्या आहेत.

Story img Loader