येत्या पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या पूर परिस्थितीला सर्व विभागाने समन्वय साधून काम करावे, कोणत्याही विभागाने हलगर्जीपणा करू नये, नागरिकांचे वित्त व जीवितहानी होऊ नये यासाठी सतर्क राहावे, अशा सूचना जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा दिल्या.
राय चौधरी सभागृहात जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पूर प्रतिबंधक उपाययोजना याविषयी आढावा घेण्यात आला. यावेळी अपर जिल्हाधिकारी पंजाबराव वानखडे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण महाजन उपस्थित होते.
 नैसर्गिक आपत्ती टाळण्यासाठी आणि आपत्ती आल्यावर काय उपाययोजना करायच्या यासंदर्भात सूक्ष्म आराखडा संबंधित विभागाने तयार करावा. जिल्ह्य़ातील ग्रामीण भागातील १६४ गावे आणि शहरातील १३ वॉर्डात संभाव्य पूर परिस्थितीचा धोका जाणवतो. नदीकाठच्या गावातील नागरिकांचे स्थलांतर करावयाचे झाल्यास त्यांची पर्यायी व्यवस्था, संपर्क तुटणाऱ्या गावात औषध आणि अन्नधान्य, इतर अत्यावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा करावा, साथरोग पसरू नये म्हणून आवश्यक ती दक्षता आरोग्य विभागाने घ्यावी, पाणीपुरवठा विभागाने नागरिकांना पुरेसे स्वच्छ व शुद्ध पाणी उपलब्ध करून द्यावे, खंडित झालेला वीज पुरवठा तातडीने सुरू करावा, दूरध्वनी सेवा खंडित झाल्यास बीएसएनएल ताबडतोब सुरू करावा. तसेच रुग्णालयात सर्पदंश झाल्यास औषधांचा साठा उपलब्ध ठेवावा, हवामान विभागाने अतिवृष्टीच्या बाबत सूचना जिल्हा प्रशासनाला वेळीच द्याव्या. गाव, तालुका आणि जिल्हास्तरीय आपतकालीन समित्या कराव्यात. त्याचप्रमाणे आपतकालीन परिस्थितीत उपयोगी पडणाऱ्या व्यक्ती, संस्था यांचे दूरध्वनी क्रमांक अद्ययावत करावे, अशा सूचना जिल्हधिकारी कृष्णा यांनी दिल्या. या बैठकीला बीएसएनएल, एमएसईबी, हवामान, पोलीस, सार्वजनिक बांधकाम, कृषी विभाग,  पाणीपुरवठा, रेल्वे, अग्निशमनदल आदी खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा