वीज वितरण कंपनीच्या अमळनेर उपविभाग दोनमधील कृषिपंपधारकांकडे तब्बल १७ कोटी ३१ लाखांची थकबाकी राहिल्याने कंपनीने थकबाकीदारांच्या कृषिपंपाचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम हाती घेतली असून, याअंतर्गत १७०० कृषिपंपाचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.
या उपविभागात सुमारे ५६४१ कृषिपंपधारक थकबाकीदार आहेत. या विभागातील तब्बल ११५ रोहित्र बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. ६० टक्के शेतकऱ्यांनी थकबाकी भरली तरच रोहित्र सुरू करण्यात येतील, अशी महावितरणने भूमिका घेतली आहे. या आर्थिक वर्षांतील म्हणजे एप्रिल २०१२ ते सप्टेंबर २०१३ पर्यंतची किमान पाच वीज देयके जरी भरली तरी वीजपुरवठा सुरळीत करण्यास अधिकाऱ्यांनी अनुकूलता दर्शविली आहे.
अमळनेर उपविभाग हे धरणगाव विभागाअंतर्गत येते. धरणगाव विभागात चार तालुके येतात. या विभागाची तब्बल २३७ कोटी ८३ लाख रुपयांची कृषी वीजपंपाची थकबाकी आहे. चारही तालुक्यातील वसुलीचे प्रमाण अतिशय अल्प आहे. एप्रिल २०१२ पासून अमळनेर तालुक्याची १५ टक्के, चोपडा १७ टक्के, धरणगाव ८.०९ टक्के, तर सर्वात कमी एरंडोल तालुक्याची ३.५० टक्के एवढीच वसुली झाली आहे. महावितरणकडून होणाऱ्या कारवाईने मात्र ऐन रब्बी हंगामात शेतकरी मेटाकुटीस आला असून, विहिरींना व कूपनलिकांना मुबलक पाणी असूनही ते पिकांना देता येत नाही, अशी अवस्था आहे.