उत्तराखंडमध्ये ढगफुटीने थैमान घातल्यानंतर नांदेडकरांचाही जीव टांगणीला लागला आहे. येथून चारधाम, उत्तराखंडात तीर्थक्षेत्रांना दर्शनास जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्कालीन विभागात नाव नोंदविणाऱ्यांची संख्या वाढतच असून, ताज्या नोंदीनुसार १७५ भाविक उत्तराखंड परिसरात अडकल्याची माहिती आहे. पैकी ३६ जणांशी संपर्क होऊ शकला. महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती दिलीप कं दकुर्ते, तसेच त्यांच्या समवेत २७ भाविकांचा यात समावेश आहे. हे सर्व हैदराबादहून नांदेडकडे येण्यास रवाना झाले.
उत्तराखंडमध्ये ढगफुटी होऊन गंगा, यमुना, अलकनंदा, तसेच छोटय़ा-मोठय़ा नद्या वाहू लागल्या. जलप्रलयाने मोठा हाहाकार उडाला. अनेक इमारती वाहून गेल्या. जागोजागी भाविक अडकून पडले. नांदेड येथून विविध यात्रा कंपन्यांच्या माध्यमातून, तसेच खासगी वाहनांमधूनही भाविक नेहमीच चारधाम यात्रेस जातात. सध्या जिल्हा प्रशासनाकडे झालेल्या नोंदणीत १७५ पैकी ३६ भाविकांचा संपर्क होऊ शकला. हे सर्व सुखरूप आहेत. शिवाय बहुतेक जण हैदराबादपर्यंत पोहोचले आहेत. उर्वरित भाविकांचा मात्र संपर्क होऊ शकला नाही.
जिल्हा प्रशासन रुद्रप्रयाग, हृषीकेश व अन्य संबंधित जिल्हा प्रशासनांच्या संपर्कात आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिली. शहरातल्या गणेशनगर, शिवाजीनगर, तरोडा नाका भागातील काही कुटुंबे अजूनही संपर्क क्षेत्राबाहेर असून त्यांचे नातेवाईक चिंतेत आहेत.

Story img Loader