युरिया मिश्रीत शेतातील केळीचे खोड खाल्ल्याने विषबाधा होऊन यावल तालुक्यातील डांभुर्णी येथे १८ काठेवाडी गायींचा मृत्यू झाला. अद्याप ८१ गायींवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती पशु संवर्धन अधिकाऱ्यांनी दिली. दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर जिल्ह्यात परप्रांतीय जनावरांना चराई बंदी असतानाही ही जनावरे येथे आलीच कशी, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
डांभुर्णी परिसरातील उंटावद शिवारात गोपाल पालक यांच्या शेतात काठेवाडी कुटुंबाने ठिय्या दिला आहे. या कुटुंबाकडे सुमारे ५०० गायी आहेत. गुरूवारी रात्री केळीच्या शेतात चरत असताना काही गायी अचानक खाली कोसळल्या. काही गायींचा जागीच मृत्यू जाला. या घटनेची माहिती डांभुर्णी येथील पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांना कळविण्यात आली. त्यांनी घटनास्थळी येऊन गायींची तपासणी केली. गायींची लक्षणे पाहून युरिया मिश्रीत केळीचे खोड खाण्यात आल्याने विषबाधा झाल्याचा निष्कर्ष त्यांनी काढला. गायींना विषबाधा झाल्याची माहिती जिल्हा पशु संवर्धन अधिकाऱ्यांना कळविण्यात आल्यानंतर त्यांच्यासह जिल्ह्यातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक त्वरेने डांभुर्णी येथे उपस्थित झाले. त्यांनी विषबाधा झालेल्या इतर गायींवर औषधौपचार सुरू केले. डॉ. व्ही. जी. फालक यांनी या घटनेत ११ मध्यम तर सात मोठय़ा गायींचा मृत्यू झाल्याची माहिती डॉ. व्ही. जी. फालक यांनी दिली. दरम्यान, जळगाव जिल्ह्यात अत्यल्प पावसामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून त्यामुळे जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजुरकर यांनी जिल्ह्यात परप्रांतीय जनावरांसाठी चराई बंदीचे आदेश दिले होते. जिल्ह्याच्या यावल, चोपडा, मुक्ताईनगर आदी तालुक्यांच्या सिमेवर गुजरात व मध्यप्रदेश कडून मोठय़ा प्रमाणावर येणाऱ्या जनावरांना अडविण्याचे आदेश देण्यात आले होते.
डांभुणी परिसरात विषबाधा झालेल्या काठेवाडी गायी मोठय़ा संख्येने पळासनेर, शिरपूर या भागातून आल्याचे सांगण्यात येते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा