विमानांसाठी कार्पेट पुरविण्याच्या प्रकरणात झालेल्या घोटाळ्याप्रकरणी तपास करणाऱ्या केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) १८ वर्षांपूर्वी कारवाई केलेले एअर इंडियाचे न्यूयॉर्कमधील तत्कालीन व्यवस्थापक एम. एल. थत्ते यांची विशेष न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेल्या या घोटाळ्यात थत्ते यांना विनाकारण गोवले गेल्याचा निष्कर्षही न्यायालयाने नोंदविल्यानंतर आता त्यांनी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे ठरविले         आहे.
१९९४ मध्ये एअर इंडियाला विमानांसाठी कार्पेट हवे होते. त्यामुळे अमेरिकेतील पीडब्ल्यूसीएम कंपनीला कार्पेट पुरविण्याचे कंत्राट देण्यात आले. या कंपनीने नऊ हजार चौरस मीटर इतके कार्पेट मुंबईत पाठविले. परंतु ते दर्जाहिन असल्यामुळे एअर इंडियाच्या गुणवत्ता नियंत्रण विभागाने फेटाळले. तोपर्यंत या कंपनीला तब्बल ४७ हजार मीटर इतक्या कार्पेटचे कंत्राटही दिले गेले. इतकेच नव्हे तर पैसे अदा करण्यासाठी असलेली मुदतही कमी करण्यात आली. दरम्यान ही कंपनी दिवाळखोरीत गेली. त्यामुळे एअर इंडियाने कार्पेटपोटी दिलेले पैसे बुडाले. या बाबत थत्ते यांना दोषी ठरवून त्यांना नंतर बडतर्फ करण्यात आले होते.
या प्रकरणी सीबीआयने थत्ते यांच्याविरुद्ध १९९८ मध्ये भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला होता.
या प्रकरणी २००१ मध्ये खटला सुरू झाला. तब्बल ११ वर्षे चाललेल्या या खटल्यात १९ साक्षीदार तपासले गेले. या कंत्राटात पैसे अदा करण्याबाबतच्या अटी बदलण्यास थत्ते कारणीभूत असल्याचा आरोप केला गेला. परंतु थत्ते यांनी वेळोवेळी त्याविरुद्ध लेखी आक्षेप घेतला होता, हे त्यांचे वकील मिहिर घीवाला यांनी निदर्शनास आणून दिले. एअर इंडियाच्या मुंबईतील मुख्यालयाने दिलेल्या सूचनांचे त्यांनी पालन केले. कार्पेट खरेदी करण्याबाबतचा निर्णय तसेच पैसे अदा करण्याबाबतची मुदत कमी करण्याबाबत तत्कालीन उप संचालक व्ही. के. वर्मा तसेच प्रभाकर जोशी आणि अनिल जोहरी या अधिकाऱ्यांनी घेतले होते, असेही त्यांनी स्पष्ट केले. याबाबत थत्ते यांनी घेतलेल्या आक्षेपांकडे वेळीच लक्ष पुरविले गेले असते तर एअर इंडियाचे कोटय़वधींचे नुकसान टळले असते. परंतु त्यावेळी फक्त चौकश्या केल्या गेल्या आणि थत्ते यांना दोषी ठरविले गेले. मात्र जबाबदार अधिकाऱ्यांना अभय मिळाले, असे विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एम. व्ही. कुलकर्णी यांनी सीबीआयच्या तपास अधिकाऱ्यावर ताशेरे ओढताना स्पष्ट केले  आहे. 

Story img Loader