दुबईत भारतीय शिक्षणसंस्थांनीही आता झेंडा रोवला असून त्यांची संख्या वाढत आहे. संयुक्त अरब अमिरातीमध्ये वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांची मुले किंवा भारतातून तेथे शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचीही या शिक्षणसंस्थांनाच पहिली पसंती मिळू लागली आहे. उच्च व तंत्रशिक्षण संस्थांना महाराष्ट्रात किंवा देशात विस्तार करण्यापेक्षा दुबईत शिक्षणसंस्था उभारणे व्यावसायिकदृष्टय़ा अधिक किफायतशीर वाटत असल्याने दुबई भविष्यात उच्च व तंत्रशिक्षणाचे ‘एज्युकेशन हब’ बनण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे.
संयुक्त अरब अमिरातीतील शैक्षणिक वातावरण गेल्या ७-८ वर्षांत खूपच बदलले आहे. तब्बल १९ भारतीय शिक्षणसंस्थांनी दुबईत जम बसविला असून त्यामध्ये पाच हजाराहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शिक्षणसंस्थांमध्ये बिट्स पिलानी, एस.पी.जैन मॅनेजमेंट, माहे मणीपाल यासारख्या नामांकित शिक्षणसंस्थांचा समावेश आहे. बिट्सची रास अल खैम येथील संस्था ही बिहारमधील रांचीची शाखा आहे. महाराष्ट्रात व भारतातही उच्चशिक्षणसंस्था स्थापन करणे खर्चिक तर आहेच, पण कायदे व नियम अधिक किचकट आहेत. शिक्षणसंस्था चालविताना राजकीय हस्तक्षेप, विद्यार्थी संघटना व लालफितीचा कारभार या साऱ्यांना तोंड द्यावे लागते.
या तुलनेत दुबईत शिक्षणसंस्था सुरू करण्यासाठी अडथळ्यांची संख्या कमी आहे. पहिली गोष्ट म्हणजे, रुपया-दिरामच्या विनिमय दराचा शिक्षणसंस्थेला फायदा होतो. दुबई किंवा संयुक्त अरब अमिरातीमध्ये भारतीयांचे प्रमाणही लक्षणीयरीत्या वाढले असून या शिक्षणसंस्थांमध्येही भारतीय विद्यार्थ्यांचाच भरणा आहे. अभियांत्रिकी व व्यवस्थापन अभ्यासक्रमासाठी ७०० जागा आहेत. त्यासाठी प्रवेश घेतलेले ९० टक्के विद्यार्थी आखातात राहणारे भारतीय आहेत. तर उर्वरित विद्यार्थी भारतातून आलेले आहेत. बिट्सच्या शिक्षणसंस्थेत १७००, माहे मणीपाल संस्थेत १८०० विद्यार्थी असून त्यातील ८५-९० टक्के भारतीय विद्यार्थी आहेत. भारतातील शिक्षणखर्चापेक्षा तीन-चार पट अधिक खर्च येत असला तरी अमिरातीतील जीवनशैलीच्या तुलनेत तो योग्य आहे. भारतीय विद्यार्थी अन्य देशांमध्ये शिक्षणासाठी जातात. तेथील खर्चापेक्षा दुबईत खर्च कमी येतो. महाराष्ट्र सरकारने देशी व परदेशी शिक्षणसंस्थांना खासगी विद्यापीठे स्थापन करण्यासाठी आवाहन केले आहे. पण आरक्षण, शुल्क याबाबतच्या तरतुदी, मंजुरीतील अडथळे यांचा विचार करता त्यांना दुबईमध्ये अधिक चांगल्या संधी आहेत. त्यामुळे दुबईकडे भारतीय शिक्षणसंस्थांचा कल आहे.
भारतीय शिक्षणसंस्थांचा दुबईत झेंडा!
दुबईत भारतीय शिक्षणसंस्थांनीही आता झेंडा रोवला असून त्यांची संख्या वाढत आहे. संयुक्त अरब अमिरातीमध्ये वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांची मुले किंवा भारतातून तेथे शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचीही या शिक्षणसंस्थांनाच पहिली पसंती मिळू लागली आहे.
First published on: 20-07-2013 at 12:11 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 19 indian education institutions in dubai