आर्णी येथील पै. हाजी हफीज बेग सामाजिक संस्थेच्या पुढाकाराने आयोजित मुस्लिम सामूहिक विवाह मेळाव्यात १९ निकाह मोठय़ा थाटात संपन्न झाले. सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे विवाहपूर्व स्वागत सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी प्रामुख्याने उपस्थित होते, तर प्रमुख अतिथी म्हणून मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास मंडळाचे संचालक ख्वाजाबेग, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामजी आडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती विठ्ठल देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते.
सामूहिक मेळाव्याचे आयोजन येथील बाबा कम्बलपोष दरगाहवर करण्यात आले होते. वेळेची व पैशाची बचत आणि सामूहिक मेळाव्यात लग्न करणे म्हणजे अल्लाहची मर्जी राखणे होय, असे विचार शिवाजीराव मोघे यांनी अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केले. विशेषत: सर्वधर्मीय सामूहिक मेळावा घेण्यात यावा, असेही आव्हान त्यांनी मेळाव्यातून बोलताना केले.
ख्वाजाबेग, रामजी आडे, विठ्ठल देशमुख यांनीही मार्गदर्शन केले. स्वागताध्यक्ष म्हणून उपनराध्यक्ष आरीजबेग प्रामुख्याने कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांनी मुस्लिम समाजासमोरील आर्थिक, सामाजिक समस्यांना शैक्षणिक मागासलेपणा कारणीभूत असून लग्न व इतर अनावश्यक खर्च करण्यापेक्षा गुणवंत विद्यार्थ्यांना समाजाने आर्थिक मदत करावी, असे आवाहन केले. कार्यक्रमासाठी हाजी शौकत शोलंकी, यासीन इशाणी, साजीदबेग, खलीलबेग, कादर इशाणी, अनवर पठाण, सैय्यद अनवर, युनुस शेख, शेख शरीफ, सैय्यद अकबरअली हैदरी ग्रुप, अल्पसंख्यांक कर्मचारी संघटना नॅशनल फ्रेन्डस् क्लब, इलाही ग्रुप, अलहक ग्रुप व दरगाह कमेटीच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रास्ताविक स्वागताध्यक्ष आरीजबेग यांनी, तर सूत्रसंचालन इरफान रजा यांनी केले.
मेळाव्यास मोठय़ा संख्येने सर्वधर्मीय मंडळी उपस्थित होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 19 muslim group wedding in arni