उल्हासनगर येथील उल्हास विद्यालयात १९८७-८८ मध्ये दहावी इयत्तेत शिकलेल्या विद्यार्थ्यांचा वर्ग पुन्हा एकदा तब्बल २५ वर्षांनी गेल्या रविवारी भरला. विशेष म्हणजे या पुनर्भेटीत त्यांना त्यावेळी शिकविणारे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच शिपाईसुद्धा उपस्थित होते. या बॅचचे विद्यार्थी असणारे उज्ज्वल चौधरी तसेच देवेंद्र जैन यांच्या मुरबाड तालुक्यातील पऱ्हे येथील ‘औदुंबर हिरवाई’ या निसर्गकेंद्रात हा सोहळा पार पडला.
‘किती बदलला/बदलली आहेस किंवा इतकी वर्षे झाली हा/ही अगदी तस्साच/तश्शीच आहे’ अशा संवादांनी संमेलनात सकाळी रंग
भरू लागला. लांबून येणारे काही तसेच पुढाकार घेणारी मंडळी तयारीसाठी शनिवारी संध्याकाळीच आली होती. सकाळी अकरा वाजता मुख्य सोहळा सुरू झाला. शाळेतील आठल्ये, बापट, जोशी, भागवत, चौधरी या शिक्षिका तसेच भामरे आणि जंगम हे शिक्षक संमेलनास आवर्जून उपस्थित होते. त्यातील चौधरी मॅडमचा अपवाद वगळता इतर सर्व जण निवृत्त झाले आहेत. राष्ट्रगीत गायनाने तसेच प्रतिज्ञावाचनाने शाळेचा हा वर्ग सुरू झाला. त्यानंतर सर्व शिक्षकांनी आपल्या मनोगतात पाव शतकानंतर आपुलकीने भेटलेल्या माजी विद्यार्थ्यांचे कौतुक करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. भागवत मॅडमने ‘तिफन’ आणि ‘कणा’ या दोन कविता वाचून मुलांना थेट मराठीच्या तासाची आठवण करून दिली.
विद्यार्थ्यांच्या वतीने सर्व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. तसेच शाळेनंतरच्या जीवनात विशेष यश मिळविणारे उज्ज्वल चौधरी, सुनीता बागूल आणि देवेंद्र भांबरे या माजी विद्यार्थ्यांचा शिक्षकांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला. उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना या संमेलनाची आठवण म्हणून एक विशेष स्मृतिचिन्ह देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन देवेंद्र जैन यांनी केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा