उद्यापासून (गुरुवार) सुरू होणाऱ्या बारावीच्या परीक्षेला औरंगाबाद विभागातून १ लाख १३ हजार ६२ विद्यार्थी बसणार असून कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा व्हाव्यात, यासाठी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने ३३ पथके नेमली आहेत. या काळात विद्यार्थ्यांवरील ताण दूर करण्यासाठी समुपदेशकांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. पालकांसाठी हेल्पलाइनही सुरू करण्यात आली आहे.
कॉपीमुक्तीसाठी महसूल प्रशासनानेही कंबर कसली असून त्यांनी भरारी पथके स्थापन केली आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात यासंदर्भात बैठक घेण्यात आली. औरंगाबाद शहरात ३४१ महाविद्यालयांमधील ११२ केंद्रांमध्ये परीक्षा होणार असून जिल्हय़ातील ४० हजार ९९६ विद्यार्थी परीक्षेत बसतील. बीडमध्ये ८५ केंद्रांवर, परभणी ५०, जालना ४९ व हिंगोलीतील २३ केंद्रांवर परीक्षा होणार आहे. अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्तही परीक्षा केंद्रांवर तैनात केला असून दहावीच्या परीक्षेची तयारीही शिक्षण मंडळाने पूर्ण केली आहे. दहावीसाठी ५१२ केंद्रांपैकी ७ केंद्रांना उपद्रवी घोषित करण्यात आले असून ५८ परीक्षक नेमण्यात आले आहेत.

Story img Loader