राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त (दि. २४) जिल्ह्य़ातील १८ वर्षे पूर्ण झालेल्या नवमतदारांना मतदार ओळखपत्र देण्यात येणार आहेत. जिल्ह्य़ात एकूण १ लाख ६८ हजार ६८२ मतदारांची नावे (१८ वर्षे पूर्ण केलेल्या मतदारांसह) नव्याने मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत.
जिल्हा निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी सुनिल माळी यांनी ही माहिती दिली. २४ जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन आहे. त्यानिमित्त जिल्ह्य़ातील महाविद्यालयांमध्ये निबंध स्पर्धा, सायकल रॅली, प्रभात फेरी, भित्तीपत्रके, रांगोळी, वक्तृत्व स्पर्धा यासारखे विविध उपक्रम राबवण्यात आले आहेत. मतदानाबाबत जागृती व्हावी यासाठी पथनाटय़ेही होणार आहेत.
जिल्हा नियोजन भवन येथे २४ जानेवारीला होणाऱ्या मुख्य कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देण्यात येतील. नवमतदारांना त्याच वेळी मतदार ओळखरपत्रांचे वाटप होईल. त्यादिवशी प्रभात फेरी होणार आहे. शहरात ठिकठिकाणी पथनाटय़ सादर करण्यात येईल. यावेळी उपविभागीय अधिकारी राजेंद्र पाटील, तहसीलदार सी. वाय. डमाळे, नेहरू युवा केंद्राचे समन्वयक चंद्रकांत गायकवाड आदी उपस्थित होते.