‘म्हाडा’च्या घरांची सोडत पारदर्शक व्हावी, त्यातील ‘मानवी त्रुटी’ दूर व्हाव्यात यासाठी ऑनलाइन सोडतीची पद्धत सुरू झाली खरी. पण या सोडतीच्या कामात एकप्रकारे मक्तेदारी झाल्याचा लाभ उठवत सोडतीसाठी माहिती तंत्रज्ञान पुरवणाऱ्या कंपनीने मागच्या वर्षीपेक्षा थेट तिप्पट दर आकारत तब्बल सव्वा दोन कोटी रुपयांची मागणी केली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा निविदा मागवण्यात आल्या आहेत.
मुंबई परिसरात सर्वसामान्यांच्या घरांचे स्वप्न साकार करणारी संस्था म्हणून ‘म्हाडा’च्या घरांकडे साऱ्यांचे लक्ष असते. काही हजार घरांसाठी लाखाहून अधिक लोकांचे अर्ज येतात. २०१२ मध्ये मुंबईतील ८७६ व मिरा भाईंदर येथील १७२६ अशा २५९३ घरांसाठी ‘म्हाडा’ची सोडत झाली. त्यासाठी तब्बल एक लाख ३८ हजार अर्ज आले. या सर्व अर्जदारांची ऑनलाइन यादी तयार करून त्यांची सोडत काढण्याचे काम ‘मास्टटेक’ या कंपनीने घेतले होते. त्यासाठी त्यांनी ७० लाख रुपये शुल्क आकारले होते.
आता मे महिन्यात पुन्हा एकदा सुमारे चार हजार घरांसाठी ‘म्हाडा’ची सोडत होण्याची अपेक्षा आहे. या सोडतीसाठी माहिती तंत्रज्ञान सेवा पुरवण्याकरता व ऑनलाइन सोडत काढण्यासाठी पुन्हा एकदा निविदा मागवण्यात आल्या. त्यात केवळ ‘मास्टटेक’ याच कंपनीने निविदा भरली. मागच्या वर्षी ७० लाख आकारणाऱ्या या कंपनीने वर्षभरात आपले शुल्क तिपटीने वाढवून मागत तब्बल सव्वा दोन कोटी रुपयांची निविदा भरली. या अव्वाच्या सव्वा दरामुळे ‘म्हाडा’चे वरिष्ठ अधिकारी थक्क झाले. त्यांनी पुन्हा एकदा निविदा प्रक्रिया राबवली असून आता किती लोक निविदा भरून कामासाठी पुढे येतात व किती रक्कम आकारतात याबाबत उत्सुकता असणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा