एक दोनदा नाही, तर तब्बल ५१ वेळा अतिवृष्टी झाल्याने जिल्ह्य़ातील अडीच लाख हेक्टरमधील पीक वाहून गेल्याने १ लाख ९२ हजार ५६८ शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात आहे. दोन वेळच्या जेवणाची वानवा असताना मुलांच्या अंगावर नवीन कपडे, फटाके, फराळ तर सोडाच दिवाळीत पणती पेटवण्यासाठी तेल तरी कुठून आणायचे इतकी वाईट अवस्था आहे. शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीचा एक नवा पैसाही मदत मिळालेली नाही. त्यामुळे आमची दिवाळी आता कायम अंधारातच, अशी व्यथा शेतकरी बोलून दाखवीत आहेत.
यावर्षी पावसाने अक्षरश: या जिल्ह्य़ाला झोडपून काढले. या जिल्ह्य़ाच्या वार्षिक सरासरीएवढा पाऊस जून, जुलै व ऑगस्ट या तीन महिन्यांतच पडला. सलग चार वेळा पूर आल्याने चंद्रपूर शहरातील जवळपास २५ हजार लोकांना पुराचा फटका बसला, तर ग्रामीण भागात शेतीच्या शेती वाहून गेली. त्यामुळे यावर्षी शेतात काहीच पिकले नाही. जूनमध्ये सुरू झालेला पाऊस आताही सुरूच असून गणपती, दुर्गादेवी, दसरा व आता दिवाळीच्या तोंडावरही मुसळधार पाऊस पडत असल्याने ग्रामीण भागात अतिशय वाईट चित्र बघायला मिळत आहे. जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार यावर्षी जिल्ह्य़ात एक दोनदा नाही, तर तब्बल ५१ वेळा अतिवृष्टी झाली आहे. शासनाच्या अध्यादेशानुसार एका दिवसात ६५ मि.मी.पेक्षा अधिक पाऊस झाला की, ती अतिवृष्टी समजली जाते. यावर्षी चंद्रपूर, गोंडपिंपरी, चिमूर, वरोरा, राजुरा, भद्रावती या शहरात एका दिवशी दोनशे ते अडीचशे मि.मी. पावसाची नोंद घेण्यात आली आहे. ही स्थिती बघता कृषी खात्याने ५१ वेळा अतिवृष्टी झाल्याची नोंद घेतल्याचे देशमुख म्हणाले. यावर्षी शेतात सोयाबीन, कापूस, तूर, धान, ज्वारीसोबत भाजीपालाही निघालेला नाही. जिल्हा कृषी अधीक्षक जाधव यांनी घेतलेल्या नोंदीनुसार अडीच लाख हेक्टरमधील पीक पूर्णत: वाहून गेले आहे. आठ ते दहा हजार हेक्टर शेतजमीन तर पावसामुळे खरडून निघाली आहे. अशा स्थितीत शेतात पिकणार काय, असा प्रश्न शेतकरी करीत आहेत. बहुतांश शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली आर्थिक मदत अजूनही मिळालेली नाही. त्याचा परिणाम या जिल्ह्य़ातील १ लाख ९२ हजार ५६८ शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार आहे. साधी पणती लावण्यासाठी तेल तरी कुठून आणायचे, घरातील लहान मुले नवीन कपडे, फटाके व फराळासाठी मायबापाच्या मागे लागतात. खिशात पैसा नाही आणि दोन वेळच्या जेवणाची वानवा असताना मुलांच्या इच्छा तरी कशा पूर्ण करायच्या व सावकाराचे कर्ज तरी कसे फेडायचे, असा प्रश्न या शहराजवळच्या मारडा गावातील शेतकऱ्यांना पडला आहे. हीच व्यथा शेतमजुरांचीही आहे. या जिल्ह्य़ात ३ लाख ३ हजार शेतमजूर आहे. यावर्षी शेतीच पुरात वाहून गेल्याने शेतमजुरांच्या हाती काम नव्हते. त्यामुळे त्यांचीही दिवाळी अंधारातच जाणार आहे. शहराजवळच्या दाताळा, मारडा, हडस्ती, विसापूर, शिवनी, देवाडा, सास्ती, आरवट, चारवट, चिंचाळा व परिसरातील गावात फेरफटका मारल्यानंतर कास्तकारांच्या घरात अंधार दिसत आहे. बहुतांश शेतकरी तर दिवाबत्तीतच कसेबसे दिवस काढत आहेत. इतकी वाईट अवस्था कास्तकारांची यावर्षी प्रथमच बघायला मिळत आहे. धान उत्पादकांचीही अशीच अवस्था असून संपूर्ण अर्थकारणच बिघडल्याची व्यथा त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. त्यातच परतीच्या पावसामुळे नुकसान होत आहे. दरम्यान, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांच्या मदतीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आलेला आहे, परंतु अजूनही मदत आलेली नाही, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण बडकेलवार यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.
जिल्ह्य़ातील रस्त्यांसाठी १८३१ कोटी रुपयांची मागणी
जुलै, ऑगस्टमधील अतिवृष्टीने पिकांसह रस्त्यांचेही मोठे नुकसान झाले. जिल्ह्य़ातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी १८३१ कोटी रुपये मंजूर करावे, अशी मागणी विधानसभेचे माजी उपसभापती अ‍ॅड. मोरेश्वर टेंभुर्डे यांनी केली. जिल्ह्य़ात गेल्या चार-पाच महिन्यांपासून पाऊस कोसळत आहे. या पावसाने शेती, रस्ते, घरांचे मोठे नुकसान झाले. महाराष्ट्रात अशीच स्थिती आहे. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी ९२२ कोटी रुपये मंजूर केल्याची माहिती अ‍ॅड. मोरेश्वर टेभुर्डे यांनी दिली. पावसामुळे महाराष्ट्रासह जिल्ह्य़ात भीषण परिस्थिती निर्माण झाली होती. त्यासाठी महाराष्ट्रात ९२२ कोटी रुपये मंजूर करण्यात आले. त्यात पिकांच्या नुकसान भरपाईसाठी ८२२ कोटी, मत्स्य नुकसानीसाठी ११ कोटी ७० लाख आणि घराच्या नुकसानीसाठी ४५ कोटी २६ लाख रुपये मंजूर करण्यात आले. अन्य नुकसानीसाठी ३४ कोटी रुपये राखीव ठेवण्यात आले असल्याचे अ‍ॅड. टेंभुर्डे यांनी सांगितले. कापूस पिकाचे मोठे नुकसान झालेले आहे. पत्रकार परिषदेला दीपक जयस्वाल, हिराचंद बोरकुटे, अनुराधा जोशी यांची उपस्थिती होती.

Story img Loader