गेल्या आठवडाभरातील पावसामुळे विदर्भातील सिंचन प्रकल्पांमधील जलसाठा अडीच टक्क्यांनी वाढला असून एकूण पाणीसाठा १ हजार ६७७ दशलक्ष घनमीटर झाला आहे. मोठय़ा प्रकल्पांमधील पाणीसाठय़ात तर ४.५ टक्क्यांची वाढ झाली आहे.
मान्सून सक्रिय झाल्यानंतर गेल्या काही दिवसांत विदर्भातील सर्व सिंचन प्रकल्पांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने धरणांमधील पाण्याची पातळी वाढू लागली आहे. यंदाच्या उन्हाळ्यात अनेक सिंचन प्रकल्पांनी तळ गाठला होता. विशेषत: पश्चिम विदर्भातील धरणांमध्ये अत्यंत कमी जलसाठा शिल्लक होता. पण, सध्या सुरू असलेल्या पावसामुळे सिंचन प्रकल्पांमध्ये पाण्याचा येवा वाढला आहे. अमरावती विभागातील ९ मोठय़ा सिंचन प्रकल्पांमध्ये तर ८८ दशलक्ष घनमीटर (६ टक्के) पाणी साठवले गेले आहे. चार मोठय़ा प्रकल्पांमध्ये तर पावसाळ्याच्या पंधरा दिवसांतच ६० ते ७० टक्क्यांपर्यंत जलसाठा पोहोचला आहे, हे चांगले संकेत मानले जात आहेत.
आठवडाभरापूर्वी नागपूर विभागातील मोठय़ा प्रकल्पांमध्ये ८३२ दलघमी पाणीसाठा होता. तो सोमवारी ९१७ दलघमीपर्यंत पोहोचला. ही वाढ ३ टक्क्यांची आहे. गडचिरोली जिल्ह्य़ातील दिना प्रकल्प पूर्णपणे आटला होता. सात दिवसांत तब्बल ३४ टक्के पाणी साठवले गेले. आता सध्या या प्रकल्पात २३ दलघमी पाणीसाठा आहे. भंडारा जिल्ह्य़ातील बाघ पुजारीटोला प्रकल्पातील पाणीसाठा आठवडाभरात १२ टक्क्यांनी, तर वर्धा जिल्ह्य़ातील धाम प्रकल्पात ८ टक्के जलसाठा वाढला आहे. नागपूर विभागातील गोसीखुर्द प्रकल्पात सध्या १८९ दलघमी म्हणजे ६३ टक्के जलसाठा आहे.
अमरावती विभागातील नऊ मोठय़ा प्रकल्पांमध्ये सात दिवसांपूर्वी ३१८ दलघमी पाणीसाठा होता. चांगला पाऊस बरसल्याने सोमवारी तो ४०६ दलघमीपर्यंत पोहोचला. एकूण २६ टक्के पाणीसाठा या प्रकल्पांमध्ये आहे. यवतमाळ जिल्ह्य़ातील पूस प्रकल्पात सर्वाधिक ४१ टक्के पाणीसाठय़ाचा संचय सात दिवसांमध्ये झाला आहे. बुलढाणा जिल्ह्य़ातील वाण आणि अकोला जिल्ह्य़ातील काटेपूर्णा प्रकल्पातील पाणीसाठा १० ते १४ टक्के वाढला आहे. यंदा या प्रकल्पांमधील पाणीसाठा झपाटय़ाने कमी झाला होता. बुलढाणा जिल्ह्य़ातील पेनटाकळी आणि खडकपूर्णा या प्रकल्पांमध्ये यंदाही पाणी साठवणूक करण्यात आलेली नाही. यवतमाळ जिल्ह्य़ातील बेंबळा प्रकल्पाच्या बुडित क्षेत्रातील घुईखेड या गावातील काही गावकरी अजूनही पुनर्वसित ठिकाणी पोहोचलेले नाहीत. रविवारी या गावात पाणी शिरले. बेंबळा प्रकल्पात ७४ दलघमी पाणी साठवले गेले आहे. आठवडाभरात ३ टक्के जलसाठा वाढला आहे. प्रशासनाने गावकऱ्यांना गाव खाली करण्यास सांगितले आहे.
विदर्भातील मध्यम आणि लघू प्रकल्पांच्या पाणलोट क्षेत्रात मात्र अजूनही चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे. या सिंचन प्रकल्पांच्या स्थितीत फारशी सुधारणा होऊ शकलेली नाही. विदर्भातील ६३ मध्यम प्रकल्पांमध्ये सोमवापर्यंत २०५ दलघमी, तर ६४८ लघू प्रकल्पांमध्ये १४९ दलघमी पाणी साठवले गेले आहे. मध्यम प्रकल्पांमधील जलसाठा आठवडाभरात अध्र्या टक्क्यांनीच वाढला आहे. अमरावती विभागात तर किंचितशी वाढ आहे. नागपूर विभागातील लघू प्रकल्पांमध्ये काहीच सुधारणा झालेली नाही. या प्रकल्पांमध्ये सध्या केवळ ३१० दलघमी पाणीसाठा आहे. विदर्भातील मोठय़ा, मध्यम आणि लघू अशा  एकूण ७३६ सिंचन प्रकल्पांमध्ये सध्या १६७७ दलघमी (२४ टक्के) पाणीसाठा एकत्रित झाला असून तो गेल्या वर्षी याच कालावधीत १८ टक्के होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा