कल्याण-डोंबिवली पालिकेच्या कारभाराचे शासनाच्या स्थानिक निधी लेखापरीक्षा विभागाच्या लेखा परीक्षकांनी केलेल्या लेखा परीक्षण अहवालात २ अब्ज ६८ कोटी ३ हजार ३१० रुपयांची वसुली व आक्षेप नोंदविले आहेत. सन २०११-२०१२ या आर्थिक वर्षांतील कारभारात हे सर्व आक्षेप घेण्यात आले आहेत.
स्थानिक लेखा परीक्षा विभागाचे सहसंचालक चंद्रशेखर बिवलकर, साहाय्यक संचालक सु. तू. शहापूरकर यांनी हा लेखापरीक्षण अहवाल तयार करून पालिका, शासनाला सादर केले आहेत. सुमारे १२०० कोटींचा अर्थसंकल्प असलेल्या कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत विविध विकास कामे सुरू आहेत. राज्य आणि केंद्र शासनाचा निधी अनेक कामांना मिळाला आहे. कर्जे उभारण्यात आली आहेत.
कल्याण डोंबिवली पालिकेच्या एकूण ४२ विभागांत सन २०११-१२ मध्ये सुरू असलेल्या आर्थिक कामकाजाचे लेखा परीक्षण करण्यात आले आहे. या विभागांमध्ये कामकाज करताना झालेल्या आर्थिक अनियमितता, त्रुटी निदर्शनास आणल्या आहेत. त्या दूर करण्यासाठी लेखा परीक्षकांनी काही कागदोपत्री दस्तऐवज, पुरावे पालिका कर्मचारी, अधिकाऱ्यांकडे मागितले. मात्र ते वेळीच सादर केलेले नाहीत. त्यामुळे या सर्व आर्थिक अनियमिततेची नोंद लेखा परीक्षण अहवालात घेण्यात आली आहे.
पाणीपुरवठा योजना, टँकर्सने पाणीपुरवठा, झोपडपट्टी पुनर्वसन योजना, तेथील लाभार्थीना घरे देताना घातलेला गोंधळ, मालमत्ता कर थकबाकी, घनकचरा विभाग, पालिका रुग्णालयांतील औषध खरेदी, सीमेंट रस्ते दुरवस्था, वाहन खरेदीमधील गोंधळ, परिवहन उपक्रम, शिक्षण मंडळातील साहित्य खरेदीतील आर्थिक अनियमितता, पालिकेच्या भूखंडावरील बांधकामे, गाळे यांमधील वसुलीतील त्रुटी, प्रभाग कार्यालयांमधील आर्थिक अनागोंदी अशा गंभीर १९६ विषयांवर लेखा परीक्षकांनी आपले आक्षेप नोंदविले आहेत. वसुली व आक्षेपांच्या २ अब्ज ६८ लाख रुपयांच्या रकमेबाबत पूर्तता करण्याचे आदेश पालिका प्रशासनाला दिले आहेत.
या आक्षेपांची पूर्तता करण्याअगोदरच आयुक्त शंकर भिसे यांनी हा अहवाल १९ ऑगस्टच्या महासभेपुढे ठेवल्याने खळबळ उडाली आहे. संगणकीकरणाच्या माध्यमातून लोकाभिमुख कामकाज करणारी देशातील पहिली महापालिका म्हणून नावलौकिक मिळालेल्या कल्याण डोंबिवली पालिकेच्या कारभारात अब्जावधी रुपयांचे आक्षेप निघाले आहेत. पालिकेत गेल्या १३ वर्षांपासून सुरू केलेल्या ई-गव्हर्नन्स योजनेचा मग फायदा काय झाला, असे प्रश्न जागरूक नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा