परभणी शहर महापालिकेचा २०१३-१४ चा २ कोटी ९० लाख २१७ रुपयांच्या शिलकी अंदाजपत्रकास गुरुवारी स्थायी समितीने मंजुरी दिली.
बी. रघुनाथ सभागृहात सकाळी ११ वाजता स्थायी समितीचे अध्यक्ष विजय जामकर यांनी हे अंदाजपत्रक मांडले. महापालिका उपायुक्त दीपक पुजारी, स्थायी समिती सदस्य डॉ. विवेक नावंदर, अ‍ॅड. जावेद कादर, शाम खोबे, महेश फड, अंबिका डहाळे, अतुल सरोदे, अश्विनी वाकोडकर, दिलीप ठाकूर, शिवाजी भरोसे आदी उपस्थित होते.
जामकर यांनी मांडलेल्या अंदाजपत्रकात एकूण महसूल जमा ३ अब्ज ३१ कोटी ५० लाख ४५ हजार ३१७ रुपये, तर खर्च ३ अब्ज २८ कोटी ६० लाख ४५ हजार १०० रुपये दर्शविला आहे. दोन कोटी ९० लाख २१७ रुपये शिलकी अंदाजपत्रकास स्थायी समितीने मान्यता दिली.
स्थानिक संस्था करातून (एलबीटी) ३६ कोटी १० हजार रुपये मिळतील, असे अंदाजपत्रकात नमूद केले आहे.
मालमत्ता करातून १३ कोटी ६३ लाख, नगररचना विभागातून १ कोटी ३२ लाख, इमारत भाडे, जमीन भाडे आदींमधून ३१ कोटी ९४ लाख ६४ हजार २५० असा महसूल जमा होणार आहे.
शासकीय अनुदान व अंशदानातून महापालिकेला २०१३-१४मध्ये ५ कोटी ६० लाख १७ हजार २०० रुपये मिळतील, असे गृहीत धरले आहे, तर निविदा फॉर्म विक्री, घनकचरा, खतविक्री आदींमधून महापालिकेला २ कोटी ७१ लाख ९७ हजार ३०० रुपये उत्पन्न मिळण्याचे अंदाजपत्रकात अपेक्षित धरले आहे.
येत्या आर्थिक वर्षांत महापालिकेने आस्थापना खर्चासाठी २४ कोटी ७ लाख रुपयांची तरतूद केली आहे. अर्थसंकल्पाचे वाचन लेखाधिकारी विजय देशमुख यांनी केले.