कर्जत तालुक्यातील दूरगाव येथे शेतीच्या वादातून चुलत्याने पुतण्याचा सुपारी देऊन निर्घृण खून केल्याची घटना घडली. यासंदर्भात पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
दूरगाव येथील प्रकाश भाऊसाहेब वाघमारे (वय २७) या तरुण पुतण्याची शेती हडपण्यासाठी, त्याचा चुलता पांडुरंग हरिभाऊ वाघमारे (रा. थेरवडी, कर्जत) याने सागर अजिनाथ जोगंदड (रा. टाकळीसिंग, आष्टी) याच्या मदतीने, कुऱ्हाडीचे घाव घालून निर्घृण खून केला. या गुन्हय़ाला अनैतिक संबंधाच्या संशयाचीही किनार असल्याचा उल्लेख पोलीस तक्रारीत करण्यात आला आहे.
दूरगाव येथील शिवास सालईवस्ती येथे प्रकाश वाघमारे हा त्याची पत्नी कोमल व दीड वर्षांची मुलगी शुभांगीसह राहात होता. मात्र ही जमीन तुझ्या वडिलांनी मला विकली, त्यामुळे ती परत दे व तू येथे राहू नको असे प्रकाशला,चुलता पांडुरंग सतत म्हणत असे. गेल्या आठवडय़ात याच वादातून पांडुरंगने पाइपलाइन फोडली. ही जमीन हडपण्यासाठी पांडुरंग याने सागर अजिनाथ जोगदंड याला सहा महिन्यांपूर्वी येथे आणले व शेतामध्ये राहण्यास जागा दिली. सागर याने त्यासाठी प्रकाशबरोबर मैत्री केली. काल घटनेच्या दिवशी सागर व प्रकाश हे जमदारवाडा येथे काळे यांच्या लग्नासाठी गेले होते. तेथून मोटारसायकलवरून घरी आल्यावर प्रकाश याच्या घरी सागर आला व ओटय़ावर दोघे गप्पा मारीत बसले.
त्या वेळी प्रकाश याची बायको कोमल घरात भांडी घासून ते फळीवर लावत होती. माझ्या बायकोकडे का पाहतो असे प्रकाश म्हणाल्याने दोघांत भांडणे सुरू झाली. सागर याने घरात असलेली कुऱ्हाड आणली, भांडणे पाहून भीतीने कोमल घराच्या बाहेर पळाली, दोघांतील वाद वाढला व सागर याने त्या वेळी तुला मारायलाच आलो आहे असे म्हणत कुऱ्हाडीने कपाळावर जोरदार घाव घातले. कुऱ्हाडीचे वार एवढे जोरात होते, की कपाळाच्या कवटीत कुऱ्हाड अडकली. नंतर सागर मोटारसायकलवरून पळून गेला.
माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण राख घटनास्थळी आले. त्यांनी कोमलच्या तक्रारीवरून चुलता पांडुरंग वाघमारे व टाकळीसिंग येथे जाऊन सागर जोगदंड यास अटक केली.