ग्रामीण गुन्हे शाखेच्या एका नायक शिपायाच्या सतर्कतेमुळे जबलपूर महामार्गावर दोन कोटी रुपये लुटणाऱ्यांपैकी एक लुटारू दोन तासात ग्रामीण गुन्हे शाखेच्या हाती लागला. या प्रकरणी एकूण चार आरोपींना अटक करण्यात आली असून लुटीतील १ कोटी ४६ लाख रुपये जप्त करण्यात आले. जबलपूर मार्गावरील मोर फाटा येथे शनिवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. ही रक्कम हवाला व्यापारातील आहे का, याचा तपास केला जाणार असून ही रक्कम प्राप्तिकर खात्याकडे जमा केली जाणार असल्याचे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
नागपुरातील एक घाऊक सुपारी व्यापारी टी.टी. शेणॉय यांचा व्यवस्थापक परेश महेंद्र भिमजियानी (रा. नागपूर) हा मैहर येथे गेला होता. तेथून ते त्यांच्या स्वीफ्ट कारने (एमएच/३१/डीके/७१३५) नागपूरला तीन महिला कर्मचाऱ्यांसह परत येत होते. देवलापारजवळील मोर फाटा येथे मागून वेगात आलेल्या एका इंडिका कारने ओव्हरटेक केले. त्यातील पाचजणांनी थांबविले. कारची काच दगडाने फोडून आरोपींनी कारमधील चौघांना जबरीने खाली उतरविले. ती कार घेऊन लुटारू पळाले. काही अंतरावर कार थांबवून त्यातील बॅगा आपल्या कारमध्ये टाकल्या. परेश भिमजियानी याने देवलापार पोलीस ठाणे गाठून कारसह तीन बॅग, दोन मोबाईल व रोख सात हजार रुपये लुटल्याची तक्रार केली.
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ग्रामीण भागात बंदोबस्त तैनात होता. ग्रामीण गुन्हे शाखेचा नायक शिपाई उमेश ठाकरे हा जबलपूर मार्गावरील मनसर टोल नाक्यावर साध्या वेषात तैनात होता. रात्री अकरा वाजताच्या सुमारास मनसरकडून आलेल्या एका इंडिका कारचा (एमएच/२७/एच/५९८४) क्रमांक लिहिलेली पट्टी तुटलेली दिसल्याने त्याला शंका आली. त्याने चालकाला याचे कारण विचारले. ते सांगताना तो गडबडला. त्याची विचारपूस करीत असताना शंका आली. दुपारी तो येथून प्रवासी घेऊन गेल्याचे सांगितल्याने नाक्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे चित्रीकरण तपासले. त्यात दुपारी मनसरकडे जाताना तीन तरुण बसलेले दिसले. आता ते कुठे, या प्रश्नावर त्याने दिलेली माहिती शंकास्पद होती. शिपाई ठाकरे याने तातडीने ग्रामीण गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजन पाली यांना ही बाब सांगितली. याचवेळी पोलीस अधीक्षक डॉ. शर्मा, अतिरिक्त अधीक्षक प्रकाश जाधव हे ग्रामीण गुन्हे शाखेस बंदोबस्तासंबंधी सूचना देऊन निघतच होते. तेवढय़ात ही माहिती समजल्याने त्यांनी ग्रामीण गुन्हे शाखेस, तसेच देवलापार पोलिसांना मनसरला रवाना केले.
देवलापार पोलिसांनी कारमधील आरोपी शेख यासीन उर्फ राजू शेख नजीर (चालक) याला पोलीस ठाण्यात आणले. तोपर्यंत तेथे पोहोचलेल्या ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने या आरोपींची कसून चौकशी केली. त्यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी रविवारी प्रजासत्ताक दिनी दिवसभर शोध मोहीम राबविली. विविध ठिकाणी जाऊन एकूण १ कोटी ४६ लाख रुपये जप्त केले. शेख अफसर उर्फ अस्सु शेख सत्तार, मोहम्मज नवशाद मोहम्मद नवाब (रा. राजीव गांधीनगर, नागपूर), मोहम्मद हारून रशिद अब्दुल हमिद (रा. कामठी) या चौघांना ताब्यात घेतले. अटक केलेले आरोपी २४ ते ३० वर्षांचे आहेत. हारूनवगळता इतर तिघांविरुद्ध किरकोळ गुन्हे दाखल आहेत. हारून व शेख अफसर हे स्टार बसमध्ये कंत्राटी वाहक होते. काही दिवसांनंतर त्यांचे हे काम संपले.
राजीव गांधीनगरमधील एका पानठेल्यावर हे तिघेही नेहमी बसायचे. तेथे शेख अफसरच्या घराजवळ राहणाऱ्या एका ऑटोरिक्षावाल्याने त्यांना टीप दिली. जबलपूरकडून नेहमी एक कार येते. वेळ नक्की माहिती नव्हती. या तिघांनीही कामठीच्या यासीनला कार घेऊन बोलावले. ही कार यासीनच्या जावयाची आहे. शनिवारी दुपारी मोर फाटाजवळ ते थांबले. रात्री नत्र वाजताच्या सुमारास त्यांना या क्रमांकाची कार येताना दिसली. त्यांनी कारचा पाठलाग करून लुटले. कारने मनसरजवळ आले असता चाक पंक्चर झाले. कारमधील अतिरिक्त चाक लावून ते नागपूरकडे निघाले. वाटेत यासीनला चाकाचे पंक्चर दुरुस्त करायला सांगितले. तेथून एक कार भाडय़ाने घेतली आणि ते नागपूरच्या दिशेने निघून गेले.
ओळखणाऱ्यांनीच दिली आरोपींना टीप
शेख अफसरने रक्कम त्याच्या मैत्रिणीकडे ठेवली होती. या बॅगांमध्ये एक कोटी रुपये असावेत, असा कयास लुटारूंचा होता. रक्कम लुटल्यानंतर त्यांनी मोजलीही नव्हती. यासीनव्यतिरिक्त इतर तिघांची घरे अतिक्रमण मोहिमेत उध्वस्त झाली होती. या रकमेतून त्यांनी घरे बांधण्याचे ठरविले होते. यासीन पोलिसांच्या हाती लागल्याचे त्यांना समजल्याने त्यांनी हाती लागेल तेवढी रक्कम विविध ठिकाणी नेऊन ठेवली. सुपारी व्यापाऱ्याला ओळखणाऱ्या दोघांनी या आरोपींना टीप दिली. त्यांची नावे पोलिसांना समजली असून त्यांचा शोध सुरू आहे. ग्रामीण गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजन पाली, सहायक पोलीस निरीक्षक हृदयनारायण यादव, दिनेश लबडे, महेश कोंडावार, उपनिरीक्षक अरविंद सराफ, शिपाई उमेश ठाकरे, रवी ठाकूर, संजय पारडवार, मुदस्सर, प्रमोद बन्सोड, सुरेश गाते, मंगेश डांगे, अजय तिवारी, चेतन राऊत, दिलीप कुसराम, सचिन शर्मा यांनी ही कामगिरी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा