मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी नगरला मंगळवारी झालेल्या रास्ता रोको आंदोलनात एसटी बस पेटवून दिल्याप्रकरणी अटक करण्यात २८ आरोपींना न्यायालयाने बुधवारी २ दिवसांची पोलीस कोठडी दिली. कँप पोलीस ठाण्यात या प्रकरणी एकूण ४८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जीपीओ चौकात रास्ता रोको करून बस पेटवून दिल्याप्रकरणी मराठा सेवा संघाचे प्रदेश संघटक कृषिराज टकले, मराठा आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे पदाधिकारी किरण काळे, जिल्हाध्यक्ष प्रशांत कल्हापुरे, मनोज पाटील, प्रल्हाद पाटील, रामकिसन मडके, संजय कर्डिले, अजय जगताप, राजेंद्र सावंत, विलास कराळे आदी २८ जणांना कँप पोलिसांनी घटनेनंतर लगेचच अटक केली. मात्र एकूण ४८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अटक करण्यात आलेल्या २८ जणांना कँप पोलिसांनी बुधवारी नगरच्या न्यायालयात उभे केले होते. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. आर. शर्मा यांच्यासमोर ही सुनावणी झाली. आरोपींच्या वतीने संदीप वांढेकर, राहुल पवार व संदीप डापसे यांनी काम पाहिले. त्यांनी बस जाळण्याच्या घटनेशी आंदोलनाचा काहीच संबंध नसल्याचे सांगितले. रास्ता रोको आंदोलन व बस जाळण्याचा प्रकार या दोन्ही वेगवेगळय़ा ठिकाणी घडलेल्या घटना आहेत. पोलिसांनी त्या एकत्र करून कार्यकर्त्यांवर जाचक कले लावले असून त्यांना जामीन मिळावा असा युक्तिवाद केला. मात्र सरकारी वकील हिरे यांनी या प्रकरणातील अजूनही २० आरोपींना अटक करायची आहे असे स्पष्ट केले. तसेच आंदोलन व बस जाळणे या दोन्ही घटना वेगवेगळय़ा असल्या तरी त्या आंदोलनाशीच संबंधित आहेत असे सांगून बस जाळण्यासाठी वापरलेले साहित्य हस्तगत करायचे आहे, त्यामुळे या आरोपींना ७ दिवस पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. न्यायालयाने २ दिवसांची पोलीस कोठडी दिली.
दरम्यान, या आंदोलनादरम्यान समाजकंटकांनी बस जाळल्याचा खुलासा मराठा सेवा संघाचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश काळे व माजी जिल्हाध्यक्ष गणेश जाधव यांनी केला आहे. बस जाळण्याच्या प्रकाराशी आंदोलकांचा काहीच संबंध नसून हिंसात्मक प्रकाराचा संघटना निषेधच करीत आहे. आंदोलकांवर विनाकारण लावण्यात आलेली जाचक कलमे त्वरित वगळून त्यांची मुक्तता करावी व खऱ्या आरोपींना अटक करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यासाठी त्यांनी चक्री उपोषणाचाही इशारा दिला आहे. अटकेतील आरोपींनी मंगळवारी अन्नत्याग केल्याचे समजते.      

Story img Loader