डेंगीच्या साथीने शहरात मागच्या पंधरा दिवसांत दोघांचा मृत्यू झाल्याचे महानगरपालिकेनेच स्पष्ट केल्याने याबाबत आता चिंता व्यक्त होऊ लागली आहे. मनपाने याबाबत शहरातील खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनाही विविध सूचना दिल्या आहेत.
डेगी व अन्य विषाणुजन्य साथींच्या आजारांबाबत मनपाच्या आरोग्य विभागानेच बुधवारी पत्रक प्रसिध्दीस दिले आहे. शहरात सध्या ठिकठिकाणी कच-याचे ढीग साचले असून अस्वच्छतेमुळे मुळातच नागरिकांमध्ये साथीच्या आजारांविषयी चिंतेचे वातावरण असतानाच मनपाच्या आरोग्य विभागानेच डेंगीच्या साथीची कबुली दिल्याने ही चिंता अधिकच वाढली आहे. दोघांच्या मृत्यूच्या कारणांची चौकशी करून त्याचा अहवाल आल्यानंतरच हा निष्कर्ष काढण्यात आल्याचेही मनपाच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
मनपाने याबाबत नुकतीच शहरातील डॉक्टरांची बैठक घेतली. या बैठकीत साथींच्या आजारांबाबत सतर्कतेचे आवाहन करण्यात आले. त्यादृष्टीने थंडी-ताप, डेंगी, मलेरिया व अन्य विषाणुजन्य आजारांचे रूग्ण आढळल्यास तातडीने तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, रुग्णांच्या विविध चाचण्या प्राधिकृत प्रयोगशाळांमध्येच कराव्या, या चाचण्यांमध्ये वरील साथींबाबत सकारात्मक अहवाल आल्यास मनपाच्या आरोग्य विभागाला तातडीने त्याची माहिती कळवण्याचे बंधन खासगी डॉक्टरांवर घालण्यात आले आहे.
डेंगी अथवा अन्य विषाणुजन्य रुग्णांवर तज्ञ डॉक्टारांशिवाय अन्य डॉक्टरांनी उपचार करू नये अशी सक्त ताकीद मनपाच्या आरोग्य विभागाने केली आहे. अन्यथा संबंधित डॉक्टरांवर कायेदशीर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. नागरिकांनीही थंडीचे दिवस लक्षात घेऊन साथीच्या आजारांविषयी सतर्कता बाळगावी असे आवाहन मनपाचे आरोग्याधिकारी डॉ. सतीश राजूरकर यांनी केले असून प्रामुख्याने डेंगीच्या एडिस डासांची उत्पत्ती होऊ नये यासाठी विशेष खबरदारी घ्यावी असे त्यांनी कळवले आहे.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा