महालक्ष्मी मंदिरातील दोन दरवाजे येण्याजाण्यासाठी तर दोन दरवाजे केवळ बाहेर जाण्यासाठी वापरात आणले जाणार आहेत. मंदिराच्या सुरक्षेसाठी अद्ययावत यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे, असा निर्णय बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला.    
गेल्या आठवडय़ात मुंबई येथे पोलीस आयुक्तालयामध्ये महालक्ष्मी मंदिरातील सुरक्षेबाबत बैठक झाली होती. त्यामध्ये काही निर्णय घेण्यात आले होते. या निर्णयाची चर्चा करण्यासाठी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. जिल्हाधिकारी राजाराम माने, आमदार राजेश क्षीरसागर, महापौर प्रतिभा नाईकनवरे, पोलीस अधीक्षक विजयसिंह जाधव, आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.     
महालक्ष्मी मंदिरात चार दरवाजे आहेत. त्यातील दोन दरवाजे सुरू करण्यात यावे, असा निर्णय मुंबईतील बैठकीत घेण्यात आला होता. आजच्या बैठकीत दोन दरवाजातून ये-जा करण्यास मुबा राहणार आहे. तर दोन दरवाजांतून फक्त बाहेर पडता येणार आहे. घाटी दरवाजातून अपंगांना प्रवेश दिला जाणार आहे. मंदिरातील दुकानदारांना आठवडय़ातून तीन विशिष्ट दिवशी त्यांचा माल आत आणावयास मुबा राहणार आहे. या साहित्याचे स्कॅनिंग केल्यानंतरच ते दुकानात पोहोचणार आहे.     
मंदिराच्या सुरक्षेसाठी उच्च क्षमतेचे मोबाइल जॅमर, सीसी टीव्ही कॅमेरे, जनरेटर खरेदी केले जाणार आहेत. शासनाच्या सुरक्षा महामंडळाकडून सुरक्षा कर्मचारी घेतले जाणार आहेत. मंदिरातील देवस्थान समितीचे स्वयंपाकघर अन्यत्र हलविले जाणार आहे. महाद्वार रोडवरील अतिक्रमणे काढली जाणार आहेत. तसेच मंदिराच्या मागील बाजूस असलेले वाहनतळ महापालिकेशी चर्चा करून अन्यत्र हलविण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा