सोलापूर जिल्हय़ात दुष्काळाची छाया दिवसेंदिवस गडद होत असून, त्यातच भर म्हणून कर्जाची परतफेड करता येणे शक्य नसल्याने आयुष्याला कंटाळून दोघा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची घटना दक्षिण सोलापूर तालुक्यात घडली.
रावसाहेब शंकर वाघमारे (वय ४५, रा. कुसूर, सध्या रा. वडापूर) व सातलिंग बनसिद्ध निंगदळी (वय ३०, रा. हत्तूर) अशी आत्महत्या केलेल्या दोघा दुर्दैवी शेतकऱ्यांची नावे आहेत. या घटनेमुळे दक्षिण सोलापूर तालुका हादरला आहे.
मृत रावसाहेब वाघमारे यांनी आपल्या शेतातील द्राक्ष बागेसाठी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निंबर्गी शाखेतून चार वर्षांपूर्वी कर्ज घेतले होते. त्याची परतफेड करता न आल्याने कर्जाची व्याजासह थकबाकी आठ लाख ७५ हजारांपर्यंत गेली होती. हे कर्ज कसे फेडायचे, याची चिंता त्यांना सतावत असताना भीमा नदीकाठी असलेल्या द्राक्ष व उसाच्या शेतात पाणी नसल्याने हातची पिके जळून गेली होती. त्यामुळे वाघमारे यांची आणखी अडचण झाली. त्यामुळेच वैतागून त्यांनी आत्महत्येचा मार्ग पत्करल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. या घटनेची नोंद मंद्रूप पोलीस ठाण्यात झाली आहे.
हत्तूर येथे राहणारे सातलिंग निंगदळी यांची सीना नदीच्या काठी लहान शेती आहे. त्यांनी शेतीसाठी कर्ज काढले होते. परंतु एकीकडे कर्जाची थकबाकी व दुसरीकडे दुष्काळी स्थिती यामुळे सन्मानाने आयुष्य जगता येणे शक्य नसल्यामुळे त्यांनी आपल्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची नोंद विजापूर नाका पोलीस ठाण्यात झाली आहे. जिल्हय़ात आतापर्यंत यंदाच्या दुष्काळात सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे दिसून येते.

Story img Loader