मान्सूनपूर्व पावसाने जामखेड वगळता जिल्हय़ात सर्वत्र कमीअधिक हजेरी लावली. आज सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत पुन्हा एकदा राहाता तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली. काल येथे दोन इंचांपेक्षा अधिक (५४.६ मिलीमीटर) पाऊस झाला. या पावसाने अनेक ठिकाणी मोठे नुकसानही झाले.
जिल्हय़ात प्रदीर्घ काळानंतर रोहिणीच्या पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मागच्या आठवडय़ातही जिल्हय़ात सर्वत्र कमीअधिक पाऊस झाला. छोटीशी विश्रांती घेतल्यानंतर कालपासून (गुरुवार) जिल्हय़ात पुन्हा पावसाला प्रारंभ झाला आहे. जिल्हय़ाच्या पश्चिमेला अकोले तालुक्यात धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मात्र अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे. जिल्हय़ात येथूनच मान्सूनचे आगमन होते, मात्र यंदा जिल्हय़ात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली असताना या परिसरात मात्र मान्सून लांबण्याची चिन्हे आहेत.
रोहिणीच्या दमदार पावसाने जिल्हय़ात शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. अनेक ठिकाणी मागच्याच पावसात खरिपाच्या पेरणीलायक पाऊस झाल्याचे सांगण्यात येते. कालच्या पावसाने पेरण्यांना आणखी पोषक वातावरण तयार झाल्याने शेतीच्या कामांना वेग आला आहे. पहिल्या एक, दोन पावसातच काही ठिकाणी छोटय़ामोठय़ा तलावांमध्ये पाण्याची आवक झाली असून काही ठिकाणचे तळे, तलाव भरले आहेत. दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर या पावसाने पाणीटंचाईची तीव्रता काहीअंशी कमी झाली आहे.
 आज सकाळी ८ वाजता संपलेल्या चोवीस तासांतील पावसाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. हे आकडे मिलीमीटरमध्ये आहेत. अकोले- २०, संगमनेर- २७, कोपरगाव- १५, राहाता- ५४.६, श्रीरामपूर- १०, राहुरी- १२.२, नेवासे- ६, नगर- ७.५, शेवगाव- २, पाथर्डी- ४, पारनेर- १३, कर्जत- ५, श्रीगोंदे- २०, जामखेडला पाऊस झाला नाही.
वडझिरेत साडेचार इंच वृष्टी
पारनेर तालुक्यातील पाडळी नदीला आलेल्या मोठय़ा पुरात काल (गुरुवारी) मोटारीसह तिघे वाहून गेले. शहरात १३ मिलीमीटरच पाऊस झाला असला तरी वडझिरे भागात अतिवृष्टी झाली. येथे तब्बल साडेचार मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तालुक्यातील अन्य ठिकाणच्या पावसाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. वडझिरे-१११, सुपे- ४०, टाकळीभान- ७४, निघोज- ३२, भाळवणी- ३१, पळशी-९ आणि वाडेगव्हाण- १०.
 

Story img Loader