तुळजापूर रस्त्यावर तळे हिप्परगा येथे मारूती ओमनी व मोटारसायकलची धडक बसून घडलेल्या अपघातात मोटारसायकलवरील दोघा तरूणांचा मृत्यू झाला, तर अन्य तिघे जखमी झाले. मंगळवारी दुपारी पाऊणच्या सुमारास हा अपघात झाला.
देवीदास शिवाजी पाथरूट (वय २०) व रवी राजू साखरे (वय २१, दोघे रा. मड्डी वस्ती, भवानी पेठ, सोलापूर) अशी दोघा मृतांची नावे आहेत. जखमींमध्ये नवनाथ यल्लप्पा मुदगल (वय १८, रा. मड्डी वस्ती) व मारूती ओमनीमधील विजय शिवाजी कदम (वय ३१, रा. नांदोसी, ता. खटाव, जि. सातारा) यांचा समावेश आहे. त्यांच्यावर छत्रपती शिवाजी सवरेपचार शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मड्डी वस्ती भागात राहणारे दोघे तरूण मोटारसायकलवरून तुळजापूरकडे निघाले होते. शहराजवळ तळे हिप्परगा येथे समोरून येणाऱ्या मारूती ओमनी व्हॅनने (एमएच ०६/एएस १३३५) सदर मोटारसायकलला जोरदार धडक दिली. यात मोटारसायकलवर बसलेले दोघे जण गंभीर जखमी होऊन मरण पावले. तर त्याचवेळी रस्त्यावर थांबलेले अन्य दोघे व मारूती गाडीतील एक असे तिघे जण जखमी झाल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
महिलेचा अपघाती मृत्यू
सोलापूर-तुळजापूर रस्त्यावर तामलवाडीजवळ एका अज्ञात कंटेनरने धडक दिल्याने घडलेल्या अपघातात मोटारसायकलवर पाठीमागे बसलेल्या महिलेचा मृत्यू झाला. लता भालचंद्र मोरे (वय ४०, रा. गुजर वस्ती, दयानंद महाविद्यालयाजवळ, सोलापूर) असे मृत महिलेचे नाव आहे. ती आपल्या पतीसमवेत मोटारसायकलवर पाठीमागे बसून तुळजापूरहून सोलापूरकडे येत होती. तेव्हा वाटेत तामलवाडीजवळ पाठीमागून येणाऱ्या अज्ञात कंटेनरने त्यांना ठोकरले. पती भालचंद्र मोरे हे जखमी झाले, तर त्यांची पत्नी लता मोरे यांचा मृत्यू झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा