प्रवरा नदीपात्रात पोहण्यास गेलेले दोन शाळकरी मुले आज वाळूच्या खड्डय़ात बुडून मरण पावले. राहाता तालुक्यातील दाढ येथे आज दुपारी २ च्या सुमारास ही घटना घडली. चौघांपैकी दोघांना वाचवण्यात यश आले.
अक्षय जयवंत तांबे (वय १२, इयत्ता नववी) व पंकज वसंत तांबे (वय ११, इयत्ता आठवी) या दोघांचे नदीपात्रातील वाळूच्या खड्डय़ात बुडून निधन झाले. ते दोघे दाढ येथील महात्मा फुले विद्यालयात शिकत होते. त्यांच्याबरोबर असलेले योगेश सूर्यभान बनसोडे व सुजित जयवंत तांबे या दोघांना वाचवण्यात नदीकाठच्या लोकांना यश आले.
दाढ येथे सुरू असलेल्या सप्ताहाची आज सांगता होती. ती करून वरील चार शाळकरी मुले प्रवरा नदीवर पोहायला गेले. अन्य काही मुले येथे शेळ्या चारीत होते. त्यांनी या चौघांना येथे पोहण्यातील धोका स्पष्ट करून येथे पोहू नका असा सल्ला दिला होता. मात्र तो अव्हेरून हे चौघे नदीत पोहण्यास उतरले. काही वेळातच हे चौघे नदीपात्रातील मोठय़ा खड्डय़ात बुडू लागले, त्यांच्या गलक्याने नदीकाठच्या गोकुळदास गणपत बर्जे व गणेश भोसले या दोघांनी नदीत उडय़ा घेतल्या. मात्र त्यांना दोघांनाच वाचवण्यात यश आले. ते दोघेही जखमी आहेत. अक्षय व पंकज मात्र या खड्डय़ात बुडून मरण पावले. दुपारीच या दोघांचे शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. सायंकाळी शोकाकुल वातावरणात या दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Story img Loader