औद्योगिकदृष्टय़ा प्रगत जिल्ह्य़ातील मनोरंजन उद्योगाला अखेरची घरघर लागली असून दोन चित्रपटगृह बंदचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे आहे. पूर्वी या जिल्ह्य़ात २० चित्रपटगृहे होती. आज केवळ ८ चित्रपटगृहे असून  दोन बंद होण्याच्या मार्गावर आहेत.
 या जिल्ह्य़ातील चित्रपटगृहे एकापाठोपाठ एक बंद पडत चालल्याने मनोरंजन उद्योग पिछाडीवर पडला आहे. या जिल्ह्य़ात मिश्र संस्कृती आहे.  या जिल्ह्य़ात जेथे मराठी नाटके हाऊसफुल्ल होतात तसेच हिंदी नाटकांसोबत इतर भाषिक नाटके व चित्रपटही येतात. जसा हिंदी व मराठी चित्रपट या जिल्ह्य़ात सुपर डुपर हिट होतो तसाच तेलगू चित्रपटही हिट होतो. तेलगू चित्रपटाला मोठा प्रेक्षक लाभलेला आहे. आंध्र प्रदेशाचा सीमावर्ती भाग असल्याने येथे तेलगू भाषिकांची संख्या अधिक आहे. काही ठरावीक चित्रपटगृहांमध्ये तेलगू चित्रपट दाखविला जातो. मात्र, आता ही परिस्थिती बदलत आहे. कारण या जिल्ह्य़ातील मनोरंजन उद्योगाला अखेरची घरघर लागली आहे. जिल्ह्य़ात पूर्वी एकूण २० चित्रपटगृहे होती, परंतु आज फक्त ८ असून त्यांपैकी २ बंद होण्याच्या मार्गावर आहेत.
या जिल्ह्य़ात कोळसा खाणींमुळे अफाट पैसा लाभला आहे. पैसा अधिक त्यामुळे मनोरंजन म्हणून चित्रपट प्रेक्षकांची संख्याही भरपूर आहे. जिल्ह्य़ात ८ पैकी ६ चित्रपटगृहे फक्त चंद्रपूर शहरात आहे, तर अन्य २ पैकी, १ सिंदेवाहीत तर एक ब्रम्हपुरीत आहे. चंद्रपुरात जयंत, श्री, अभय, राजकला, राधाकृष्ण बिग सिनेमा, सपना या चित्रपटगृहांचा समावेश आहे. या शहरातील विजय, श्रीकृष्ण व शिवचित्रपट ही चित्रपटगृहे  बंद झालेली आहेत. बल्लारपूरमध्ये दिलीप व सुभाष, राजुरामधील व्यंकटेश, मुलमधील श्रीराम, ब्रम्हपुरीमधील क्रांती ही चित्रपटगृहे बंद झाली असून गडचांदूर, सिंदेवाही, नागभीड व भद्रावतीतील प्रत्येकी एक एक चित्रपटगृह आज बंद झाले आहे. जिल्ह्य़ात कामगारांची संख्या ८ लाखांच्या आसपास आहे. त्यांना मनोरंजनाकरिता चित्रपटगृहांमध्ये जाऊनच चित्रपट बघावयास आवडतो. परंतु आता या जिल्ह्य़ात फक्त ६ चित्रपटगृह असून तीही फक्त चंद्रपूर शहरात असणे ही केविलवाणी बाब आहे. इतर शहरांतील किंवा तालुक्यांतील लोकांना चित्रपट बघायचा असेल तर त्यांना थेट चंद्रपूर गाठण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. या चित्रपटगृहांवर जिल्ह्य़ातील करमणूक कर विभाग प्रत्येक तिकिटावर ४० टक्के कर वसुली करतो व ही वसुली साप्ताहिक स्वरूपाची असते. गेल्या वर्षी मनोरंजनातून करमणूक विभागाने १ कोटी ९ लाख ९८ हजार रुपयांचा कर वसूल केला होता. हा कर अधिक वाढवण्याचे दृष्टीने चांगले चित्रपट येऊन प्रेक्षकांनी ते पहावे परिणामी जास्तीत जास्त कर मिळावा, अशी अपेक्षा करमणूक विभागातील अधिकारी येरणे यांनी केली आहे. अभय, श्री, राजकला व सपना या चार चित्रपटगृहांत तर बोटावर मोजण्याइतके प्रेक्षक दिसतात. चित्रपट चांगला असो की वाईट, प्रेक्षक चित्रपटगृहात येण्यास तयार नाहीत. त्याला कारण केबल टी.व्ही.ही आहे. मेट्रो शहरातील मल्टीप्लेक्समधील   गर्दी इथे बघायला मिळत नाही. काही वर्षांपूर्वी रविवार सुट्टीच्या दिवशी कामगार चित्रपट बघायचे, परंतु आता त्यांनीही चित्रपटागृहांकडे पाठ फिरवली आहे. मोठय़ा शहरांमध्ये चित्रपट व्यवसाय काही प्रमाणात का होईना टिकून असला तरी या शहरातील मनोरंजन उद्योगाला अखेरची घरघर लागली आहे.