शताब्दी महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या कराड अर्बन बँकेने गत आर्थिक वर्षांत सर्वच पातळीवर प्रगतीचा झंजावात ठेवताना २ हजार ७३९ कोटींचा व्यवसाय साध्य करून १ हजार ६५० कोटींच्या ठेवी तर १३ कोटी २५ लाख रुपयांचा करोत्तर निव्वळ नफा कमवला आहे. एकंदर प्रगती आणि नेटवर्थमध्ये भरीव वाढ होऊन ती नेटवर्थ रक्कम १०७ कोटी म्हणजेच १०० कोटीच्या निकषापेक्षा अधिक असल्याने कराड अर्बन आंतरराज्यीय बँक (मल्टिस्टेट बँक) होण्यास पात्र झाली असल्याचे बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाषराव एरम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. अर्बन कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी, बँकेचे उपाध्यक्ष डॉ. राजीव आहिरे, मुख्य कार्यकारी अधिकारी सीए दिलीप गुरव यांच्यासह संचालक मंडळ व अधिकारी उपस्थित होते.
डॉ. सुभाषराव एरम म्हणाले की, बँकेचा शताब्दी महोत्सव २०१७ साली असून, त्या दृष्टीने व्हिजन २०१७ हे पथदर्शी धोरण तयार करण्यात आले आहे. त्यानुसार केलेल्या नियोजनबध्द वाटचालीचे फलित गतवर्षीच्या उत्तुंग यशाने सिध्द झाले आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे काल ३१ मार्चलाच सायंकाळी ७ वाजता गत आर्थिक वर्षांतील बँकेचा हिशोब पूर्ण झाला. या आर्थिक वर्षांत ठेवींचे उद्दिष्ट १ हजार ६५० कोटींचे तर कर्जाचे उद्दिष्ट १ हजार ५० कोटींचे ठेवण्यात आले होते. प्रत्यक्षात ठेवी १ हजार ६६६ तर कर्जे १ हजार ७३ कोटी रुपयांची झाली आहेत. ठेव वाढीचा वेग १८.४२ टक्के, तर कर्ज वाढीचा वेग १५.८७ टक्के राहिला आहे. बँकेला सरत्या आर्थिक वर्षांत २६ कोटी ३ लाखांचा ढोबळ नफा झाला असून, आयकर व तरतुदी वजा जाता १३ कोटी २५ लाखांचा नफा झाला आहे. नफ्यामध्ये १२.०१ टक्क्याने वाढ झाली आहे. भागभांडवलामध्ये २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. वसुलीच्या महत्वाच्या आघाडीवर देखील बँकेने प्रगती साधली असून, नक्त एनपीए चे प्रमाण २.४७ टक्के राहिले आहे. सातारच्या पोवईनाका शाखेने सर्वाधिक ४ कोटी ५ लाखांचा नफा कमावला आहे. बँकेच्या १२ शाखांचा एनपीए शून्य आहे. केंद्र व राज्य सरकारने सहकार कायद्यातील ९७ वी घटना दुरुस्ती अमलात आणली असून, या घटना दुरुस्तीस अनुसरून दिलेल्या आदर्श पोट नियमाचा स्वीकार करण्यासाठी बँकेने ७ एप्रिल रोजी सर्व साधारण सभेचे आयोजन केले आहे. प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब करीत बँकेने प्रामाणिकपणा, विश्वासार्हता आणि पारदर्शकतेच्या जोरावर बँकिंग स्पध्रेला सक्षमपणे तोंड देताना भरीव प्रगती साधली आहे. सामाजिक बांधिलकीतही बँकेने मोठे योगदान दिले आहे.
सुभाषराव जोशी यांनी बँकेच्या एकंदर कामकाजाबद्दल समाधान व्यक्त करून बँक उत्तरोत्तर नेत्रदीपक प्रगती साध्य करेल असा विश्वास दिला. दिलीप गुरव यांनी सेवक वर्गाचे सहकार्य तसेच बँकेच्या उत्तरोत्तर भरीव प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करून कराड अर्बन बँकिंग स्पध्रेत कुठेही कमी पडणार नसल्याची ग्वाही दिली. दुष्काळी भागातील बँकेच्या चारही शाखांचा एनपीए शून्य असून, दुष्काळाचा कोणताही परिणाम वसुलीवर झालेला नसल्याचे नमूद केले.
डॉ. राजीव आहिरे म्हणाले की, गत आथिर्क वर्षांसाठी जाहीर केलेली सर्व उद्दिष्टे पूर्ण करून त्याहूनही उत्तम प्रगती बँकेने साध्य केली आहे. स्वर्गीय डॉ. द. शि. एरम यांच्या विचारांना अनुसरून बँकेची वाटचाल सुरू आहे. बँक अधिकारी व सेवकांनी उत्तम कामगिरी बजावल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
कराड अर्बनचा २ हजार ७३९ कोटींचा व्यवसाय
शताब्दी महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या कराड अर्बन बँकेने गत आर्थिक वर्षांत सर्वच पातळीवर प्रगतीचा झंजावात ठेवताना २ हजार ७३९ कोटींचा व्यवसाय साध्य करून १ हजार ६५० कोटींच्या ठेवी तर १३ कोटी २५ लाख रुपयांचा करोत्तर निव्वळ नफा कमवला आहे.
First published on: 03-04-2013 at 01:11 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 2 thousand 739 crore business by karad urban bank