केंद्र शासनाच्यावतीने जे पथदर्शी प्रकल्प तयार केले जातात त्या योजनांमध्ये विदर्भातील जिल्ह्यांना आपण प्राधान्य देतो. प्रामुख्याने प्रत्येक योजनेत वाशीम जिल्ह्याच्या समावेश करण्यासाठी आपला पुढाकार असतो. वाशीम येथे माता-बाल सुरक्षा अभियानाअंतर्गत १०० खाटांच्या माता-बाल रुग्णालयासाठी केंद्र शासनाच्या वतीने २० कोटी रुपयांचा निधी आपण मंजूर केला असल्याचे प्रतिपादन केंद्रीय आरोग्यमंत्री गुलाब नबी आझाद यांनी येथे केले.
सोमवारी वाशीम दौऱ्यावर आल्यावर स्थानिक विश्रामगृहात मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, केंद्र शासनाच्या वतीने देशात ग्रामीण भागात दर्जेदार आरोग्य सुविधा मोठय़ा प्रमाणावर उपलब्ध करून दिल्या जात आहेत. त्याचा गोरगरीब व सर्वसामान्य नागरिकांना फायदा व्हावा, असा हेतू आहे, परंतु शहरी व ग्रामीण भागातील सरकारी दवाखान्यांमध्ये आवश्यक असलेले तज्ज्ञ डॉक्टर मिळत नसल्याने या लोकोपयोगी योजना यशस्वीतेपणे राबविल्या जात नसल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. केंद्र शासनाच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा सामान्य रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रात, उपकेंद्रात ३० वर्षांवरील सर्व महिला आणि पुरुषांसह गर्भवतींची कर्करोग, मधुमेह आणि ह्रदयविकाराच्या आजाराची मोफत तपासणी करण्यासाठी आवश्यक यंत्रसामुग्री उपलब्ध असूनही सरकारी दवाखान्यात विविध क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर्स उपलब्ध होत नाही. या पथदर्शी प्रकल्पाअंतर्गत आता वाशीम जिल्ह्याला अकोला अथवा वर्धा येथील वैद्यकीय महाविद्यालयांशी जोडण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचा दावा यावेळी त्यांनी केला.
 गुलाब नबी आझाद यांनी मंगळवारी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट देऊन अधिकाऱ्यांशी चर्चाही केली, परंतु त्यांचे समाधान झाले नाही. वाशीम जिल्ह्यात गोरगरीब व सर्वसामान्यांना सरकारी दवाखान्यात होत असलेल्या त्रासाबद्दल येथील प्रसिध्दी माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना आरोग्य यंत्रणेचे विविध कारनामे सांगितले. केंद्रीय आरोग्यमंत्री आझाद यांनी या संदर्भात आपण राज्याचे आरोग्यमंत्र्यांसोबत चर्चा करून वाशीम जिल्ह्यातील सर्व सरकारी दवाखान्यातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे ग्वाही यावेळी त्यांनी दिली. आपला वाशीम दौरा राजकीय दौरा नसून सामाजिक दौरा होता.
आपणास वाशीम-यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकांनी दोन वेळा निवडून दिले त्या सर्वांच्या भेटीसाठी आपण आलो असल्याची कबुलीही यावेळी त्यांनी दिली. २०१४ ची लोकसभा निवडणूक आपणास यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदार संघातून लढवायची असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
या पत्रकार परिषदेस जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उषा चौधरी, आमदार सुभाष झनक, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दिलीप सरनाईक, जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती चंद्रकांत ठाकरे, माजी आमदार सुरेश इंगळे, जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे संचालक राजू चौधरी, कॉंग्रेसचे ज्येष्ठ कार्यकत्रे नामदेव मापारी उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा