डॉक्टरांचा व परिचारिकांचा अमानवीय व्यवहार आणि योग्य औषधे मिळत नसल्याच्या कारणावरून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) २० टक्के रुग्ण आजारातून बरे होण्यापूर्वीच पलायन करतात अथवा दुसऱ्या रुग्णालयात धाव घेत असल्याचा निष्कर्ष एका अभ्यासातून निघाला आहे.
आरोग्य मंदिर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेडिकलविषयीची आस्था दिवसेंदिवस सामान्य नागरिकांमध्ये कमी होऊ लागली आहे. गरीब रुग्णांना मात्र येथे आल्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. येथे जे त्यांना अनुभव येतात, त्यानंतर त्यांच्या आस्थेत बदल घडून येतो. येथील डॉक्टरांचे उर्मट बोलणे, परिचारिकांचे रुग्णाकडे लक्ष नसणे, वेळेवर औषधे न मिळणे आदी बाबी त्यात दडल्या आहेत. आकस्मिक विभागात तर बराच वेळ रुग्ण ताटकळत राहतो. त्याला कुणी वालीच राहात नाही. रुग्णांचे नातेवाईक डॉक्टरांची वाट बघून त्रस्त होतात. अशावेळी रुग्णांच्या नातेवाईकांनी तेथील डॉक्टरांकडे जाऊन आपबिती सांगितली असता त्यांना वेगळाच अनुभव येतो. येथे कशाला आलात, डॉक्टर दुसरीकडे आहेत, त्यांना वेळ मिळाल्यानंतर तुमच्या रुग्णांकडे येतील, अशी उत्तरे मिळतात.
यानंतरही रुग्ण वार्डात भरती झाल्यास तेथे दुसरे अनुभव येतात. डॉक्टर वेळेवर येत नाहीत. आले तरी योग्य ती विचारपूस अथवा उपचार करत नाहीत. रुग्ण वेदनेने कण्हतो, असे परिचारिकेला सांगितले तर ‘मी काय करू?’ असे उत्तर मिळते. रुग्णाला दिली जाणारे सलाईन संपत आले, असे सांगितले तर पूर्ण संपली काय? रुग्णाला जेवण द्यायचे काय, असे विचारले असता मला काय विचारता, अशी उत्तरे मिळतात. त्यामुळे येथे दाखल झालेल्यापैकी २० टक्के रुग्ण बाहेरचा रस्ता धरत आहेत. असा निष्कर्ष याच रुग्णालयात काम करणाऱ्या एका सामाजिक कार्यकर्त्यांने केलेल्या अभ्यासातून काढला आहे. हा अहवाल लवकरच आरोग्यमंत्र्याकडे सादर केला जाणार आहे. आपले नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर या सामाजिक कार्यकर्त्यांने ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले की, येथील डॉक्टर अत्यंत उर्मट भाषेत रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना बोलू लागले आहेत. यापूर्वी हा प्रकार होत नव्हता. साहेब, रुग्ण वेदनेने तळमळतो. असे जेव्हा रुग्णाचा नातेवाईक डॉक्टरला सांगतो. तेव्हा, मी बघतो, असे उत्तर अपेक्षित असते. परंतु, ‘मैं क्या करू’ असे उत्तर आल्यानंतर रुग्ण खरोखरच रुग्णालयात राहणार नाहीच. अशी अनेक उदाहरणे येथे घडतात. येथील डॉक्टरांवर व अन्य कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण असल्याने ते असे बोलून जातात, असे समर्थन करणारी उत्तरे वरिष्ठांकडून मिळतात. पूर्वी येथे निशुल्क औषधे उपलब्ध व्हायची. आता रुग्णांनाच विकत आणावी लागतात. यानंतरही योग्य ती काळजी घेतली जात नसल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांकडून केला जातो.
येथे वार्डबॉय नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना स्ट्रेचर ओढून न्यावे लागते. परिसरातील शौचालये तर नेहमीच घाणीने माखलेले असते. कधी-कधी तर पिण्याचे पाणीही मिळत नाही. पिण्याच्या पाण्यासाठी वनवन भटकावे लागते. या समस्यांमुळे रुग्णाच्या नातेवाईकांच्या खराब झालेल्या मनस्थितीत आणखीच भर पडते. त्यामुळे तो बाहेर जाण्याचा मार्ग पत्करतो, असे काही निष्कर्षही या सामाजिक कार्यकर्त्यांने आपल्या अभ्यासात काढले आहेत. येथे सध्या अत्याधुनिक यंत्रसामुग्री येत आहे. इमारतीच्या भिंती सुशोभित केल्या जात आहेत. परंतु माणुसकीचा झरा आटू लागल्याने डॉक्टरांची ‘देव’ असलेली प्रतिमा आता नष्ट होऊ लागली आहे.