राज्य शासनातर्फे चालविल्या जाणाऱ्या जीवनदायी योजनेंतर्गत एकटय़ा नागपुरात शस्त्रक्रिया करण्यासाठी २०० रुग्ण अजूनही वेटिंगवर असल्याची धक्कादायक माहिती प्राप्त झाली आहे. या सर्व रुग्णांचे प्रस्ताव मंजूर झाल्यानंतरही प्रतीक्षा यादीमुळे त्यांना शस्त्रक्रियेसाठी वाट बघावी लागत आहे. या योजनेंतर्गत वेळेवर शस्त्रक्रिया व उपचार होत नसल्याने रुग्णांचे जीवनच धोक्यात आले आहे.
१ एप्रिल ते ३१ ऑक्टोबर या सात महिन्यात नागपूरच्या आरोग्य उपसंचालक कार्यालयात या योजनेंतर्गत आलेल्या प्रस्तावांपैकी एकूण १०७७ प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. यामध्ये हृदय शस्त्रक्रियेसाठी ८४९, मेंदू शस्त्रक्रियेचे २६, किडनी प्रत्यारोपणाचा एक, कर्करोग शस्त्रक्रिया व उपचाराच्या २०१ प्रस्तांवाचा समावेश आहे. त्यातील ६७७ हृदय रुग्णांवर, १० मेंदूच्या रुग्णांवर व १९० कर्करोग असलेल्या अशा एकूण ८७७ रुग्णांवर शस्त्रक्रिया व उपचार करण्यात आलेत. गेल्या सात महिन्यात हृदय रुग्णांच्या सर्वाधिक १७१ शस्त्रक्रिया सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयात झाल्या. यानंतर १६५ शस्त्रक्रिया अतिविशेषोपचार रुग्णालयामध्ये झाल्या.  तिसरा क्रमांक अवंती हार्ट इन्स्टिटय़ूटचा लागतो. तेथे ६९ शस्त्रक्रिया झाल्या. यानंतर क्रिसेंट हृदयालय ६३, केअर हॉस्पिटल ५४, श्रीकृष्ण हृदयालय ४५, डॉ. के.जी. देशपांडे मेमोरियल सेंटर २५, अर्नेजा हॉस्पिटल २१, स्पंदन हॉस्पिटल २० आणि पुरोहित रुग्णालयामध्ये ४ हृदयरुग्णांवर शस्त्रक्रिया झाल्या.  यानंतरही १७२ हृदयरुग्ण शस्त्रक्रिया आणि उपचाराच्या प्रतीक्षेत आहेत. यामध्ये १३ शालेय विद्यार्थी आणि शून्य ते सहा वर्षे वयोगटातील १४ मुलांचा समावेश आहे. यातील अनेक रुग्णांवर त्वरित शस्त्रक्रिया करणे अत्यावश्यक आहे.
मेंदू शस्त्रक्रियेचे एकूण २६ प्रस्ताव प्राप्त झालेत. त्यापैकी १० रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. सर्वाधिक ९ शस्त्रक्रिया सावंगी मेघे येथील आचार्य विनोभा भावे रुग्णालयात तर एक शस्त्रक्रिया केअर हॉस्पिटलमध्ये करण्यात आल्या. किडनी प्रत्यारोपणाचा एक प्रस्ताव प्राप्त झाला असून तो अजूनही प्रलंबित आहे. कर्करोगाचे प्राप्त झालेल्या एकूण २०१ प्रस्तावापैकी १९० रुग्णांवर शस्त्रक्रिया व उपचार करण्यात आले. कर्करुग्णांच्या १४९ रुग्णांवर आचार्य विनोबा भावे रुग्णालयात शस्त्रक्रिया व उपचार करण्यात आले. यानंतर कोलंबिया हॉस्पिटलमध्ये २१, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विभागीय कर्करुग्णालयात ८, डॉ. स्मिता गुप्ते हॉस्पिटलमध्ये ५, केअर हॉस्पिटल ४ आणि मेडिकलमध्ये ३ शस्त्रक्रिया झाल्याचे प्राप्त आकडेवारीवरून दिसून येते. कर्करुग्णाचे एकूण ११ रुग्ण प्रतीक्षा यादीत आहेत. या रुग्णांना उपचाराची व शस्त्रक्रियेची अत्यंत आवश्यकता आहे. वेदनेमुळे त्यांना जगणे अत्यंत कठीण होत आहे.
जीवनदायी योजनेंतर्गत हृदयशस्त्रक्रिया, मेंदूचे आजार, किडनी प्रत्यारोपण आणि कर्करोग या आजारावर दारिद्रय़ रेषेखालील रुग्णांना दीड लाख रुपयापर्यंतची मदत शासनाकडून प्राप्त होते. या आजारावरील शस्त्रक्रिया व उपचारासाठी शहरातील मेडिकल, सुपर स्पेशालिटी, मेयो या शासकीय रुग्णालयांसह १३ खासगी रुग्णालयांना शासनाने मंजुरी प्रदान केली आहे. परंतु या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थीना अनेक कागदपत्रांची जुळवाजुळव करावी लागते. एक प्रमाणपत्र कमी असले तरी प्रस्ताव मंजूर होत नाही. त्यामुळे अनेक लाभार्थी वंचित राहतात. या किचकट पद्धतीत बदल करून ती सुलभ करावी, अशी लाभार्थीची मागणी आहे.