येत्या मंगळवारपासून २०१३ या नव्या वर्षांला सुरुवात होत आहे. वर्षांरंभी १ जानेवारीला अंगारकी संकष्ट चतुर्थी येत आहे. तसेच या वर्षी २८ मे आणि २२ ऑक्टोबर रोजी एशा एकूण तीन अंगारकी संकष्ट चतुर्थी येत आहेत. त्यामुळे या वर्षांला ‘गणेश वर्ष’ म्हणता येईल, असे खगोल अभ्यासक पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले. या वर्षांबाबत अधिक माहिती देताना दा. कृ. सोमण पुढे म्हणाले की, २०१२ हे लीप वर्ष असल्यामुळे या वर्षांचे दिवस ३६६ होते. परंतु २०१३ मध्ये ३६५ दिवसच असणार आहेत. २०१३ मध्ये महाशिवरात्री (१० मार्च), डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (१४ एप्रिल), पारशी नववर्ष (१८ ऑगस्ट), दसरा (१३ ऑक्टोबर), दिवाळी लक्ष्मीपूजन (३ नोव्हेंबर) आणि गुरू नानक जयंती (१७ नोव्हेंबर) या सहा सुट्टय़ा रविवारी आल्याने चाकरमान्यांच्या सुट्टय़ा बुडणार आहेत. तसेच पुढील वर्षी मार्च, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या चार महिन्यांमध्ये विवाह मुहूर्त नाहीत.
२५ एप्रिलचे खंडग्रास चंद्रग्रहण आणि १८ ऑक्टोबरचे छायाकल्प चंद्रग्रहण भारतातून दिसणार आहे. ९ मे रोजी कंकणाकृती सूर्यग्रहण, २५ मे रोजी छायाकल्प चंद्रग्रहण, ३ नोव्हेंबर रोजी खग्रास सूर्यग्रहण मात्र भारतातून दिसणार नाही. २०१३ मध्ये १८ एप्रिल, १६ मे, १३ जून आणि १९ डिसेंबर असे चार गुरुपुष्ययोग आले आहेत.
परदेशात १३ अंक अशुभ मानला जातो. परंतु भारतात मात्र सर्व अंक शुभ मानले जातात. त्यामुळे २०१३ हे वर्ष भारताला प्रगतीचे जाईल, असे समजण्यास हरकत नाही, असे ते म्हणाले.