पाऊस, भूस्खलन आणि पुरामुळे उत्तराखंडमध्ये निर्माण झालेल्या निसर्गाच्या प्रकोपामुळे आठवडय़ानंतरसुद्धा सोलापूर जिल्हय़ातील २१ पर्यटक बद्रिनाथ व गंगोत्री परिसरात अडकून पडले आहेत. त्यापैकी एका पर्यटकाची प्रकृती बिघडल्याचा अपवाद वगळता उर्वरित सर्व पर्यटकांची प्रकृती उत्तम असून, या सर्वाना सोलापुरात परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यात १३ पुरुष व ८ महिलांचा समावेश असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिली.
दरम्यान, सोलापुरातील उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर व परीविक्षाधीन तहसीलदार गवळी हे दोघे आपद्ग्रस्त पर्यटकांच्या मदतकार्यासाठी उत्तराखंडमध्ये पोहोचले आहेत. तेथून त्यांचे मदतकार्य सुरू आहे. उत्तराखंड येथे सोलापूर शहर व जिल्हय़ातून गेलेल्या अधिकृत पर्यटकांची संख्या १७० इतकी होती. त्यापैकी आतापर्यंत ८ पर्यटक सुखरूप परतले आहेत. तर १४१ पर्यटक उत्तराखंडमधून परतीच्या मार्गावर आहेत. उर्वरित २१ पर्यटक अद्याप तेथे अडकले आहेत. सर्वाधिक नुकसान झालेल्या केदारनाथ येथे सोलापूरचा एकही पर्यटक अडकला नाही. १७ पर्यटक बद्रिनाथ येथे तर ४ पर्यटक गंगोत्री येथे सुखरूप आहेत, असे डॉ. गेडाम यांनी सांगितले. उत्तराखंड येथून परत येण्यासाठी सर्व पर्यटकांना रेल्वे उपलब्ध करून देण्याबरोबर प्रत्येकी दोन हजारांची मदत शासनाकडून दिली जात असल्याची माहितीही जिल्हाधिकारी डॉ. गेडाम यांनी दिली.
उत्तराखंड येथे मदतीसाठी गेलेल्या उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर (मोबाइल ९४२२६१६०३३) व परीविक्षाधीन तहसीलदार गवळी (८३९०३८७२०६) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पर्यटक व त्यांच्या नातेवाइकांना करण्यात आले आहे. येथे पर्यटक परत आले आहेत, त्यांनी जिल्हा नियंत्रण कक्षाशी (दूरध्वनी ०२१७-२७३१०१२) संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा