कुंभमेळ्यातील समस्यांवर तोडगा काढण्यासाठी येथे आयोजित ‘कुंभ थॉन २०१५’ कार्यक्रमात अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी २२ संकल्पना सादर केल्या.
संदीप फाऊंडेशनमध्ये आयोजित या कार्यक्रमात २२ तज्ज्ञांनी सहभागी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. समारोपप्रसंगी पोलीस आयुक्त कुलवंत कुमार सरंगल यांनी आजची युवा पिढी सोशल नेटवर्कचा वापर केवळ मनोरंजनासाठी करते की काय, असे वाटत असे. परंतु कुंभ थॉन कार्यक्रमात मुलांनी मांडलेल्या संकल्पना समाजाभिमुख आहेत. त्याचा आम्ही निश्चितच वापर करू, अशी ग्वाही दिली.
शासकीय यंत्रणा आणि विद्यार्थ्यांनी तयार केलेले तंत्रज्ञान याचा योग्य उपयोग करून एक प्रचंड मोठी फौज उभारण्याचे आश्वासन त्यांनी याप्रसंगी दिले. सरंगल यांनी सर्व प्रकल्प अत्यंत कुतूहलाने जाणून घेतले.
त्यांचा वापर कुठे करता येईल याबद्दल उपस्थितांशी चर्चा केली. टेप्पो जोट्टेनस (हार्वर्ड आणि एमआयटी) यांनी सर्व स्पर्धकांना त्यांच्या कल्पना मूर्त स्वरूपात कशा आणाव्यात याबद्दल मार्गदर्शन केले. अविनाश चिंचोरे (रिलायन्स लॅब) यांनी सर्वप्रथम समस्यांनंतर संशोधन म्हणजेच परिणामकारक उत्तर यांचा वापर करण्यास सांगितले. एमआयटी मीडिया लॅबचे प्रा. रमेश रासकर यांनी  संकल्पनांची प्रशंसा करून त्या अमलात आणण्याचे आश्वासन दिले.

Story img Loader