अनोळखी व्यक्तींना फोनवरून बँक तसेच क्रेडिट अथवा डेबिट कार्डाचे तपशील देऊ नये, अशा सूचना वारंवार दिल्या जातात. मात्र तरीही काही ग्राहक अशा फोन कॉल्सवर विश्वास ठेवून कार्डाचे तपशील देतात आणि मग पस्तावतात. चारकोप येथील एका उच्चशिक्षित महिलेला अशाच पद्धतीने फसविण्यात आले असून फोनवरून तिला तिच्या डेबिट कार्डाची माहिती विचारण्यात आली आणि अवघ्या काही मिनिटांतच तिच्या खात्यातून २२ हजार रुपये लंपास करण्यात आले.
विनिता मिश्रा (३७) या संगणक शिक्षिका आहेत. २७ जून रोजी रात्री ८ वाजता त्यांच्या मोबाईलवर एक फोन आला. मी बँक ऑफ बडोदाचा कर्मचारी असून तुमच्या डेबिट कार्डाच्या तपशिलाची पडताळणी करायची आहे, असे त्यावरून सांगण्यात आले.
विनिता यांचा त्यावर विश्वास बसला आणि त्यांनी आपल्या डेबिट कार्डचे तपशील सांगायला सुरुवात केली. परंतु समोरच्या व्यक्तीने पिन क्रमांक विचारल्यावर त्या सावध झाल्या आणि पिन क्रमांक देऊ शकत नाही, असे त्यांनी सांगितले आणि फोन ठेवून दिला. पण त्या काही मिनिटातच त्यांच्या बँक खात्यातून २२ हजार रुपये काढले गेले. विनिता यांनी तातडीने बँकेत धाव घेतली. पण बँकेने आम्ही अशा पद्धतीने फोन करत नाही, असे सांगितले. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे विनिता यांच्या लक्षात आले.
त्यांनी बुधवारी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. एकूण सहा वेळा हे पैसे काढण्यात आले आहेत. आम्ही या प्रकरणात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती चारकोप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंद कोळी यांनी दिली. विनिता संगणक शिक्षिका असून त्यांचा पती उच्च न्यायालयात वकील आहे.

Story img Loader