यंदा गाळप होणाऱ्या उसाला मांजरा परिवारातील सर्व साखर कारखाने प्रतिटन २ हजार २५० रुपयांची पहिली उचल देणार असल्याची घोषणा आमदार दिलीपराव देशमुख यांनी केली. शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरू झाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी पहिली उचल २ हजार ५०० रुपये जाहीर केली. मराठवाडय़ातील साखर कारखान्यांनी गाळप होणाऱ्या उसाला प्रतिटन किती उचल द्यावी? याची चर्चा सुरू झाली. प्रशासनाच्या मुंबईत आयोजित केलेल्या बैठकीत मराठवाडय़ातील कारखान्यांनी दोन हजार ते दोन हजार २०० रुपये उचल देण्याबद्दल अनुकूलता दर्शविण्यात आली. माजी मंत्री आमदार दिलीपराव देशमुख यांनी जिल्ह्य़ातील आमदार अमित देशमुख, बसवराज पाटील व वैजनाथ शिंदे, नॅचरल शुगरचे बी. बी. ठोंबरे आदींसोबत चर्चा करून यंदा गाळप होणाऱ्या उसाला प्रतिटन २२०० रुपये उचल द्यावी, असे ठरले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मांजरा परिवाराने आपल्या परिवारातील साखर कारखाने सरकार जो भाव ठरवेल त्यापेक्षा ५० रुपये अधिक उचल देतील, असे देशमुख यांनी आधीच जाहीर के ले होते. त्यानुसार २ हजार २५० रुपयांची पहिली उचल देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

शेतकरी संघटनेने पुकारलेल्या आंदोलनाचा यंदा गळीत हंगामावर राज्यभर परिणाम झाला. तथापि जिल्ह्य़ातील मांजरा परिवाराने आपली भूमिका प्रारंभीच स्पष्ट केल्याने गळीत हंगामाला त्याचा फटका बसला नव्हता.

शेतकरी संघटनेचे सत्तार पटेल, अरुण कुलकर्णी, ‘मांजरा’चे अध्यक्ष धनंजय देशमुख, ‘रेणा’चे अध्यक्ष यशवंत पाटील, ‘विकास’चे उपाध्यक्ष विजय देशमुख व ‘जागृती’चे उपाध्यक्ष लक्ष्मण मोरे यांच्याशी चर्चा करून निर्णय जाहीर केला. या निर्णयाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने स्वागत केले. जिल्ह्य़ातील इतर कारखान्यांनीही २२५० रुपयांची पहिली उचल द्यावी व त्यानंतर कारखान्याचे गाळप सुरू करावे, अशी भूमिका जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांनी जाहीर केली आहे. जे कारखाने हा भाव जाहीर करणार नाहीत त्यांना उसाचे गाळप करू देणार नसल्याची भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली. रघुनाथदादा व शरद जोशी संघटनेची भूमिका मात्र अद्याप स्पष्ट झाली नाही.

गतवर्षी १ हजार ८५० रुपयांची पहिली उचल देण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला होता. मांजरा परिवारातील कारखान्यांनी त्यानंतर २०० ते २५० रुपयांपर्यंत वाढीव हप्ता काढला आहे. ऊस उत्पादकांना अधिकाधिक पैसे मिळावेत, अशी भूमिका प्रारंभापासून मांजरा परिवाराने घेतली असल्यामुळे त्यांच्या निर्णयाचे शेतकरी वर्गातून स्वागत होते आहे.   

घोषणा फसवी – अ‍ॅड. जाधव
मांजरा परिवारातील कारखान्यांना ऊस उताऱ्यात प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळते तर पश्चिम महाराष्ट्रापेक्षा उसाचा भाव का कमी? असा सवाल उपस्थित करीत अ‍ॅड. बळवंत जाधव यांनी मांजरा परिवाराने पश्चिम महाराष्ट्रापेक्षा २५० रुपये कमी भाव जाहीर करून शेतकऱ्यांत दुजाभाव केला आहे. त्यातून शेतकऱ्यांची पिळवणूक होत आहे, यासंबंधी न्यायालयात दाद मागितली जाणार असल्याचेही म्हटले आहे.

मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 2250 first installment from manjra sugar factory