खासगी व इंग्रजी शाळांच्या स्पर्धेचा फटका बसून यंदा प्रथमच जिल्हा परिषदेकडील प्राथमिक शिक्षक मंजूर संख्येपेक्षा जादा झाले आहेत. यंदाच्या शिक्षक निश्चितीतेतून ही बाब स्पष्ट झाली. ३० सप्टेंबरच्या पटसंख्येनुसार झालेल्या शिक्षक निश्चितीत शिक्षण उपसंचालकांनी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त ठरणारे ३३८ प्राथमिक शिक्षकांचे तालुकांतर्गत समायोजन करण्यास मान्यता दिली आहे. परंतु जिल्ह्य़ातील मंजूर संख्येपेक्षा यंदा तब्बल २३ शिक्षक जादा झाले असताना अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांचे समायोजन कसे होणार या चिंतेने सध्या शिक्षक व त्यांच्या संघटनेच्या नेत्यांना भेडसावले आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी धावपळ सुरु केली आहे. या धावपळीतूनच समायोजनापूर्वीच पदवीधर पदोन्नती, विषय शिक्षक नियुक्ती देण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
यापूर्वी गेले किमान ८ ते १० वर्षे समायोजन होण्यापूर्वीच शिक्षकांच्या जागा रिक्त असत. परंतु यंदा शिक्षक जादा झाले आहेत. त्यामुळे पदाधिकारी, शिक्षण विभाग, शिक्षक यांना जि. प. शाळांविषयी आत्मपरिक्षण करण्याची आवश्यकता झाल्याचे मानले जाते.
सध्या जि. प.कडे शिक्षकांची ११ हजार ७६७ पदे मंजूर आहेत, त्यात मुख्याध्यापक ६२९ (९ रिक्त), पदवीधर ४६३ (४३ रिक्त) व उपाध्यापक १० हजार ६७५ (२३ जादा). परंतु प्रत्यक्षात उर्दुसह एकूण ११ हजार ६६७ पदे कार्यरत आहेत. उर्दु माध्यमाची २९ पदे रिक्त आहेत. नगर, पारनेर, श्रीरामपूर, श्रीगोंदे व कोपरगाव तालुक्यात शिक्षकांची पदे जादा झाली आहेत. गेल्या वर्षी जादा झालेले सोलापूरमधील १९ शिक्षक नगर जिल्ह्य़ात समायोजित करण्यात आले होते. तसे यंदा नगर जिल्ह्य़ात जादा झालेले शिक्षक परजिल्ह्य़ात बदलून जाणे आवश्यक होते. परंतु ३० सप्टेंबरच्या पटसंख्येनुसार ३३८ अतिरिक्त झालेल्या शिक्षकांचे शिक्षण उपसंचालकांच्या आदेशाप्रमाणे तातडीने तालुकास्तरावर समायोजन करणे आवश्यक असताना त्यापूर्वी ३९ शिक्षकांना पदोन्नती देऊन पदवीधरची वेतनश्रेणी लागू केली जाणार आहे. तसेच इतक्या दिवस रिक्त असलेली विषय शिक्षकांची ८४ रिक्त पदे तातडीने भरली जाणार आहेत. त्यासाठी पुढील आढवडय़ातच परीक्षा घेतली जाईल. परंतु पदे ८४ असली तरी प्रत्यक्षात त्यासाठी ७० अर्ज आले आहेत. परंतु या पदासाठी बीएडनंतर किमान पाच वर्षे सेवा झालेली असावी, अशी अट राज्य शिक्षण परिषदेने लागू केल्याने त्यातील किती अर्ज पात्र ठरतील, याविषयी शंका व्यक्त केली जाते. त्यामुळे अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करताना रिक्त जागा लक्षात घेऊन किती शिक्षक जिल्ह्य़ाबाहेर बदलून जाणार याची चर्चा होते आहे.
तालुकानिहाय अतिरिक्त झाल्याने समायोजित करावयाच्या मराठी व उर्दु माध्यमांच्या शिक्षकांची संख्या पुढीलप्रमाणे: अकोले- १६, संगमनेर- २४, कोपरगाव-१७, राहाता-१४, श्रीरामपूर-१४, राहुरी-९, नेवासे-१८ व १, शेवगाव-१६ व २, पाथर्डी-१९, जामखेड-५ व १, कर्जत-१८ व १, श्रीगोंदे-३०, पारनेर-२५ व नगर-३०.