कल्याण-डोंबिवलीतील दुर्गभ्रमंती क्षेत्रात कार्यरत असलेल्या तरूणांनी दिवाळीच्या काळात जलदुर्ग संवर्धनाविषयी जनजागृती करण्यासाठी किल्ले दुर्गाडी ते कोकण किनारपट्टीवरील २३ किल्ले असा प्रवास सुरू केला होता. प्रत्येक किल्ल्यावर जाऊन तेथील स्थानिकांशी संवाद साधत त्यांना किल्ले जागृतीसाठी सक्रिय करणे हा या मोहिमेचा उद्देश होता. मोहिमेदरम्यान त्यांनी प्रत्येक गडावर दिवाळी साजरी केली. स्वराज्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून ही मोहिम पार पडली. मात्र २३ किल्ल्यांचे वास्तव अत्यंत पाहून खूप वाईट वाटले, अशी प्रतिक्रिया या तरूणांनी व्यक्त केली. या संस्थेच्या वतीने २००२ मध्येही दिवाळीच्या काळात सागरी किल्ल्यांच्या भेटीचा उपक्रम हाती घेण्यात आला होता. त्यावेळी काढलेले छायाचित्रही त्यांनी या मोहिमेत सोबत ठेवून त्यानुसार या किल्ल्यांमध्ये झालेल्या फरकाचे निरिक्षण नोंदवले असता दहा वर्षांपूर्वी असलेली परिस्थिती पूर्णत: बदलली असल्याचे चित्र त्यांना या निमित्ताने दिसले.
या मोहिमेत या तरूणांनी बाणकोट, सुवर्णदुर्ग, फत्तेगड, गोआगड, कनकदुर्ग, गोपाळगड, जयगड, विजयगड, रत्नदुर्ग, पूर्णगज, यशवंतगड, आंबोलगड, सिंधुदूर्ग, विजयदुर्ग, देवगड, पद्मगड, राजकोट, सर्जेकोट, भरतगड, भगवंतगड, निवती, यश्वतगड, तेरेखोले या २३ किल्ल्यांचा समावेश होता. त्यांनी केलेल्या या मोहिमेत त्यांना अनुभवायास मिळालेले वास्तव विदारक असेच होते. किल्ल्यावरील माणसांनी केलेली अतिक्रमणे हे दहा वर्षांच्या तुलनेत प्रचंड वाढल्याचे दिसले. तर अनेक किल्ल्यांचे कोसळलेले बुरुज, मोडकळीस आलेल्या इमारती, बुझलेले तलाव हे अनुभव अत्यंत वेदनादायक होते. रत्नागिरीतला विजयगड हा किल्ला नामशेष होण्याच्या मार्गावर आहे कारण तो शोधण्यासही त्यांना मोठी शोधाशोध करावी लागली. बाणकोट किल्ल्याची ढासळलेली तटबंदी, सुवर्ण दुर्गाच्या पश्चिमेकडील तटबंदीची दुरावस्था मोठी होती. या तरूणांनी किल्ल्यावर स्थानिकांच्या मदतीने रांगोळी आणि दीपोत्सवाचा कार्यक्रम केला. मात्र दहा वर्षांपुर्वीचा किल्ला आणि आताचा किल्ला प्रचंड बदला असल्याचा अनुभव या तरुणांना यानिमित्ताने आल्याचे मोहिमेतील सहभागी श्रीपाद भोसले यांनी सांगितले. या मोहिमेत रामचंद्र म्हात्रे, सेल्व्हीन फर्नाडीस, डॉ श्रीधर कुलकर्णी यांनी सहभाग घेतला होता.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा