प्रशासकीय बदल्या टाळण्यासाठी जिल्हा परिषदेकडे अपंगत्वाचे बनावट प्रमाणपत्र सादर करण्याच्या गुन्ह्य़ातील ३९ प्राथमिक शिक्षकांची आज न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी हा आदेश दिला. सुरुवातीला अटक केलेल्या २८ व नंतरच्या ११ अशा एकुण ३९ शिक्षकांबाबत हा आदेश आहे. नगरच्या कारागृहात जागा नसल्याने महिला शिक्षिका वगळता २४ शिक्षक आरोपींची रवानगी विसापुर कारागृहात करण्यात आली.
गुन्ह्य़ात अटक असलेला दलाल संजय चंद्रकांत सावळे याच्यासह शिक्षक अनिल रंगनाथ भदागरे, अंबादास धोंडिबा ठाणगे, सदाशिव नारायण व्यवहारे व अरुण दशरथ ढूस या पाच जणांनी आज जामिनसाठी अर्ज सादर केला. त्यावर न्यायालयाने तपासी अधिकाऱ्यास म्हणने सादर करण्यास सांगितले. आहे. १० शिक्षकांचे जामिन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने यापुर्वीच फेटाळले आहेत. बनावट अपंगत्व प्रमाणपत्राच्या गुन्ह्य़ात ७६ शिक्षकांसह एकुण आरोपींची संख्या आता ९० झाली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही अद्याप १८ शिक्षक न्यायालयासमोर हजर झालेले नाहीत. आज न्यायालयीन कोठडीत रवानगी झालेल्या शिक्षकांना प्रथम नगरच्या कारागृहात हजर करण्यात आले होते, परंतु येथे क्षमतेपेक्षा अधिक कैदी असल्याने २४ शिक्षकांची रवानगी विसापुर कारागृहात करण्यात आली.