जिल्ह्य़ात ३३ मोठे उद्योग असून यात ५ हजार ११९ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. या उद्याोगांमध्ये ७ हजार ७०० लोकांना रोजगार उपलब्ध झाला असून ९९ मोठे व मध्यम उद्योग जिल्ह्य़ात येऊ घातले आहेत. त्याद्वारे ३ लाख ७ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असून २४ हजार ७०० लोकांना रोजगार मिळणार असल्याचे पालकमंत्री संजय देवतळे यांनी सांगितले. जिल्ह्य़ात विविध विभागाच्या वतीने विकासाची कामे मोठय़ा प्रमाणात होत असून यापुढेही सर्व सामान्यांच्या विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. सुवर्ण जयंती राजस्व अभियानांतर्गत जिल्ह्य़ातील १८३६ गावातील ४ लाख ८५ हजार सातबाराचे संगणकीकरण करण्याचे काम महसूल विभागाने केले असून ही मोठी उपलब्धी असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.
 जिल्हा पोलीस मैदानावर झालेल्या मुख्य शासकीय समारोहात पालकमंत्री संजय देवतळे यांनी ध्वजारोहण केले. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी विजय वाघमारे, माजी केंद्रीय मंत्री शांताराम पोटदुखे, माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी, जिल्हा पोलीस अधीक्षक राजीव जैन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत डहाळकर, मनपा आयुक्त प्रकाश बोखड, उपविभागीय अधिकारी आशुतोष सलील, निवासी उपजिल्हाधिकारी पी. डी. बडकेलवार व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्य़ात सुवर्ण जयंती राजस्व अभियान अतिशय प्रभावीपणे राबविली जात असून नागरिकांना लागणारे विविध दाखले वितरणासाठी जिल्ह्य़ात २९४ शिबिराचे आयोजन करण्यात आले. यात ४४ हजार ६८५ दाखले वितरित करण्यात आले असून ७६२ फेरफार अदालतीच्या माध्यमातून ११ हजार ६२७ फेरफार वाटप करण्यात आल्याचे देवतळे म्हणाले.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना जिल्ह्य़ात यशस्वीपणे राबविण्यात येत असून चंद्रपूर जिल्हा राज्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे. गेल्या वर्षभरात ६ हजार मजुरांना १०० दिवस रोजगार मिळवून देण्यात आला आहे. या योजनेवर ८९ कोटी रुपये खर्च करण्यात आले असून ३९ लाख मनुष्य दिवस निर्मिती झाली आहे. महात्मा गांधी तंटामुक्त गावमोहिमेत जिल्ह्य़ातील एकूण १०६ गावांना पुरस्कार प्राप्त झाला असून २ कोटी ५८ लाख रुपयांचा पुरस्कार निधी वितरित करण्यात आला आहे.
झोपडपट्टीधारकांना हक्काचे पट्टे देण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. याचा लाभ जिल्ह्य़ातील सर्व घोषित झोपडपट्टीधारकांना होणार आहे. शहरात या योजनेचा शुभारंभ घुटकाळा तलाव झोपडपट्टी येथून सुरू करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पावले उचलली असून अतिक्रमण नियमानुकूल होणार आहे. चंद्रपूर येथे वैद्यकीय महाविद्यालय व्हावे, अशी अनेक दिवसापासून मागणी होती. ती शासनाने पूर्ण केली असून वैद्यकीय महाविद्यालयासाठी बल्लारपूर बायपासवर पागलबाबा मंदिराजवळ २५ एकर जागा देण्यात आली. २००९ मध्ये पर्यावरण व वन मंत्रालयामार्फत ८८ औद्योगिक क्षेत्रातील पर्यावरणविषयक बाबींचे सर्वेक्षण करण्यात आले. या अहवालानुसार चंद्रपूर जिल्हा अतिप्रदूषित म्हणून घोषित केला आहे. त्याअनुषंगाने या जिल्ह्य़ातील औद्योगिक क्षेत्रातील वायूप्रदूषण व जलप्रदूषण कमी करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत कृती आराखडा तयार करण्याचे काम सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. हक्काचे वनजमिनीचे पट्टे देण्यासाठीची प्रक्रिया सुरू असून जिल्हा समितीने ३ हजार १७६ दावे मान्य केले आहेत. भूमिअभिलेख कार्यालयाने २२३० दाव्यांची मोजणी पूर्ण केली असून ११७१ प्रकरणांची क प्रत जारी केली आहे. जिल्हा समितीने मंजूर केलेल्या सर्व दाव्यांना नियमानुकूल करण्याची कार्यवाही शासनस्तरावर सुरू असल्याचे पालकमंत्री देवतळे म्हणाले. विविध विभागात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी परिविक्षाधीन पोलीस अधिकारी एस. चैतन्य यांच्या नेतृत्वातील परेडने उपस्थित मान्यवरांना सलामी दिली. उपस्थितांचे आभार निवासी उपजिल्हाधिकारी पी. डी. बडकेलवार यांनी मानले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा