श्रीसूर्या इन्व्हेस्टमेंट कंपनीत गुंतवणूक करून फसवणूक झालेल्यांची संख्या वाढत असून अकोल्यातील सिव्हील लाइन्स पोलीस ठाण्यात आतापर्यंत सुमारे १५ लोकांनी, तर खदान पोलीस ठाण्यात जवळपास १० लोकांनी फसवणूक झाल्याच्या तक्रारी केल्या आहेत.
या तक्रारींवरून सध्यातरी फसवणुकीचा आकडा ३ कोटी रुपयांवर जात आहे. अकोल्यातील रामदास पेठ पोलीस ठाण्यात २ कोटी, तर खदान पोलीस ठाण्यात १ कोटीच्या फसवणुकीच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. दरम्यान, या प्रकरणात या कंपनीचे मालक समीर व पल्लवी जोशी यांना ताब्यात घेण्यासाठी रामदास पेठ पोलिसांची तुकडी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिरीष खंडारे यांच्या नेतृत्वाखाली नागपूर येथे गेली आहे. या दोघांना ताब्यात घेण्यासाठी रामदास पेठ पोलिसांनी जिल्हा न्यायालयातून हस्तांतराचा आदेश घेतला आहे, अशी माहिती ठाणेदार विलास पाटील यांनी दिली आहे. जोशी दांमत्यास अकोल्यात आणल्यावर फसवणूक झालेले लोक पुढे येतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
श्रीसूर्या कंपनीसाठी दलाल म्हणून काम करणाऱ्या लोकांनी गुंतवणूकदारांना जाळ्यात अडकविण्यासाठी रिजन्सी लॉन व हॉटेल सेंटर प्लाझा या दोन ठिकाणी बैठका घेतल्या होत्या. या बठकांना १ हजारावर गुंतवणूकदार हजर होते, अशी माहिती मिळाली आहे.
गुंतवणूक केलेल्या रकमेवर भरभक्कम व्याज व विशिष्ट कालावधीत तीच रक्कम दुप्पट देण्याचे आमिष त्यांनी दाखविले होते. कुठल्याही बँकेपेक्षा आम्ही तुम्हाला कितीतरी पट रक्कम जास्त देऊ, असे या लोकांनी गुंतवणूकदारांना सांगितल्यावर व काहींची उदाहरणे दाखवून दिल्याने उपस्थित असलेले गुंतवणूकदार फसले व त्यांनी लाखो रुपयांची गुंतवणूक श्रीसूर्यामध्ये केली. सोने-नाणे बँकेत वा सराफाकडे ठेवणाऱ्यांना श्रीसूर्याने तुमची ती मृत गुंतवणूक आहे, हे पटवून दिले होते, असे समजते.