शहर कचरामुक्त करण्यासाठी तब्बल २५ घंटागाडय़ा सज्ज झाल्या आहेत. महापालिकेने जनतेला दिलेली ही दिवाळी भेट असली, तरी शहर स्वच्छतेची मोहीम अधिक गांभीर्याने राबविणे आवश्यक असल्याची प्रतिक्रिया जनतेतून व्यक्त होत आहे.
शहराची अस्वच्छता नेहमीचा चर्चेचा मुद्दा राहिला आहे. महापालिका या संदर्भात ठोस उपाययोजना कधी करते याकडे जनतेचे लक्ष आहे. आता कचरामुक्त परभणीचा संकल्प प्रत्यक्षात उतरविण्यासाठी २५ घंटागाडय़ा नव्याने कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. शहरवासीय, तसेच व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानांतील कचरा नालीत अथवा रस्त्यावर न टाकता घंटागाडीत टाकावा. सकाळी ७ ते १० व दुपारी २ ते संध्याकाळी ५ या वेळेत घंटागाडय़ा नेमून दिलेल्या प्रभागातून फिरतील. रुग्णालय, तसेच विविध व्यापारी प्रतिष्ठानांनी आपला कचरा या गाडीत टाकावा. गृहिणींनीही रस्त्यावर कचरा टाकू नये, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
महापौर प्रताप देशमुख, आयुक्त सुधीर शंभरकर, स्थायी समितीचे सभापती विजय जामकर, उपमहापौर सज्जुलाला, विरोधी पक्षनेते भगवान वाघमारे आदींसह नगरसेवकांच्या उपस्थितीत या घंटागाडय़ा कार्यान्वित करण्यात आल्या. दिवाळी पाडव्याच्या पाश्र्वभूमीवर नव्या घंटागाडय़ा घेऊन स्वच्छतेचा संकल्प सोडण्यात आला. प्रियदर्शनी सुशिक्षित बेरोजगार संस्थेचे ६० कर्मचारी करार तत्त्वावर घेण्यात आले आहेत.सकाळी सहापासून ते रात्रीपर्यंत शहराच्या वेगवेगळ्या प्रभागांत घंटागाडय़ांतून संकलित झालेला कचरा सात ट्रॅक्टरद्वारे उचलून टाकण्यात येणार आहे. महापालिकेने त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित केली आहे.