महानगरांमध्ये बहुतेक सर्वजण टोलेजंग इमारतीत राहात असल्याने पाणीपुरवठय़ासाठी मोठय़ा प्रमाणात वीज खर्ची होत असते, कारण पाणी आधी गच्चीवरील टाकीमध्ये साठवून मग सर्व रहिवाशांना गुरुत्वाकर्षणाने पुरविले जाते. या पद्धतीमध्ये खालच्या मजल्यांना लागणारे पाणीही आधी गच्चीवर जाऊन मगच घरात जाते. अर्थातच त्यासाठी सध्या मोठय़ा प्रमाणात अनावश्यक वीज खर्ची होते. ठाण्यातील ‘जिज्ञासा ट्रस्ट’च्या बाल वैज्ञानिकांनी सुचविलेल्या उपायांची अंमलबजावणी केली तर विद्यमान वापराच्या तुलनेत तब्बल किमान २५ ते कमाल ३५ टक्के वीज वाचू शकणार आहे.
येथील सरस्वती सेकंडरी स्कूलच्या चिन्मय परुळेकर, अमेय चित्रे, अन्वील महाजन, प्रथमेश काळे, कुणाल कदम यांनी गेल्या वर्षी जिज्ञासा ट्रस्टच्या माध्यमातून राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेत यासंदर्भातील प्रयोग सादर केला होता. गेल्या आठवडय़ात पर्यावरण दिनानिमित्त ठाण्यातील गावदेवी मंदिरात भरविण्यात आलेल्या ग्रीन आयडिया प्रदर्शनातही या प्रयोगाचे सादरीकरण करण्यात आले. प्रदर्शनास भेट दिलेल्या नागरिकांनी मोठय़ा प्रमाणात प्रतिसाद देत या प्रयोगाचे स्वागत तसेच कौतुक केले. ‘जिज्ञासा’चे विश्वस्त सुरेंद्र दिघे, स्थापत्यतज्ज्ञ जयंत कुलकर्णी, विद्युत तंत्रज्ञान सल्लागार अजित कुलकर्णी, वास्तुविशारद संदीप प्रभू यांनी त्यांना मार्गदर्शन केले.
ऊर्जा अशी वाचेल
सध्या इमारतीच्या आवारात जमिनीखाली असलेल्या टाकीतून पाणी विजेच्या साहाय्याने गच्चीवरील टाकीत चढविले जाते. त्यानंतर ते पाणी गुरुत्वाकर्षणाने सर्व रहिवाशांना पुरविले जाते. या एका मोठय़ा टाकीऐवजी प्रत्येकी तीन ते चार मजल्यांवर लहान आकाराच्या टाक्या बसविल्यास २५ टक्के वीज बचत होते. पाणी साठविण्याची एकूण उंची कमी होत असल्याने हे शक्य होते. इमारतीच्या बाजूला स्वतंत्र खांबांवर या टाक्या बसविता येऊ शकतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा