महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने केलेल्या चुकीचा फटका नगर शहरातील केंद्रांवरील सुमारे २५० परीक्षार्थीना बसला. आज झालेल्या पोलीस उपनिरीक्षकपदाच्या परीक्षेसाठी आयोगाने दोन-दोन परीक्षार्थीना एकच आसन क्रमांक दिल्याने गोंधळ उडाला. शिवाय परीक्षार्थीच्या प्रवेशपत्रावर एक केंद्र व त्याचा क्रमांक दुसऱ्याच केंद्रावर असाही प्रकार झाला. जिल्हा प्रशासनाने काही परीक्षार्थीची पर्यायी व्यवस्था केली, मात्र अनेकांना परीक्षेला मुकावे लागले. याचा अहवाल आयोगास सादर केला जाणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सदानंद जाधव यांनी दिली.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने आज पोलीस उपनिरीक्षकांच्या ७१४ पदांसाठी लेखी परीक्षा ठेवली होती. त्यासाठी नगर शहरातील १२ केंद्रांवर ८ हजार ११२ परीक्षार्थी होते. परीक्षेची वेळ सकाळी ११ ते १२.३० अशी होती. त्यासाठी परीक्षार्थीने अर्धा तास आधीच हजर राहायचे होते. अनेकजण धावपळ करत केंद्रांवर हजर झाले, मात्र त्यांच्या जागेवर दुसरेच परीक्षार्थी बसलेले आढळले. एकच क्रमांक दोन दोन परीक्षार्थीना दिला गेल्याने हा गोंधळ उडाला.
शहरातील एका परीक्षार्थीने दिलेल्या मााहितीनुसार त्याचा क्रमांक न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजमध्ये होता. तेथे तो गेला तर त्याला तेथे त्याचा क्रमांक आढळलाच नाही. केंद्रावरील अधिकाऱ्यांनी त्याला बुऱ्हाणनगरमधील बाणेश्वर विद्यालयाच्या केंद्रावर जाण्याचा सल्ला दिला. एवढय़ा लांब, तेही ऐनवेळी कसे जायचे हा प्रश्न होताच. त्याने मित्राला विनंती केली व त्याच्या मोटारसायकलवर तो बाणेश्वर केंद्रावर पोहोचला. तेथे त्याच्या क्रमांकावर दुसरीच परीक्षार्थी बसलेली होती. तिचाही क्रमांक तोच होता. बाणेश्वर केंद्रावरील अधिकाऱ्यांनी अशा क्रमांकाच्या परीक्षार्थीची दादा चौधरी शाळेतील केंद्रावर व्यवस्था करण्यात आल्याची माहिती दिली. तोपर्यंत परीक्षा सुरू झाली होती. अखेर केंद्रावरील एका परिचरला पेट्रोलचे पैसे देण्याचे मान्य करून परीक्षार्थी दादा चौधरी केंद्रावर पोहोचला, परंतु त्याची तेथेही व्यवस्था झाली नाही, त्यामुळे अखेर तो परीक्षार्थी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे गेला. परंतु अखेपर्यंत त्याची पर्यायी व्यवस्था झालीच नाही. त्याला परीक्षेला मुकावेच लागले.
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर असे सुमारे २५ ते ३० परीक्षार्थी जमा झालेले होते. तेथेही त्यांना योग्य माहिती मिळत नव्हती. टोलवाटोलवीच सुरू होती. महिला परीक्षार्थीची अवस्था तर अक्षरश: रडवेली झाली होती.
नीलेश कारखेले, हेमंत काळवाघे, दादाभाऊ काकडे, संग्राम पोटे, गौरव त्र्यंबक, निर्मला आंधळे, सचिन पडांगळे, जुबेर शेख, आतिष बडे, चंद्रकला शिंदे, शिवाजी कांबळे, नवनाथ ऐखे आदी परीक्षार्थीना परीक्षेस मुकावे लागले.
युवा सेनेचे विक्रम राठोड यांच्यासह सतीश धाडगे, दीपक कांबळे, संदीप दातरंगे, रमेश मिसाळ, आनंद भागानगरे, नरेंद्र येवलेकर आदींनी या प्रश्नासंदर्भात निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन लक्ष वेधले. ज्या दोन परीक्षार्थीना एकच क्रमांक मिळाला, त्यांची उत्तरपत्रिका विहित नमुन्यात पाठवली जाणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.
 वर्षभराच्या परिश्रमावर पाणी
अधिकारी होण्याच्या अपेक्षेने वर्षभर परिश्रम घेऊन अभ्यास केला, पैसे भरून खासगी क्लास लावले, परंतु महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे अनेक परीक्षार्थीना परीक्षेस मुकावे लागले, याला जबाबदार कोण, असा प्रश्न पारनेर येथील परीक्षार्थी दादाभाऊ काकडे यांनी उपस्थित केला.