जिल्ह्य़ातील व सीमा भागातील कोणत्याही कारखान्यांपेक्षा जवाहर कारखाना नेहमीच जादा दर देण्यामध्ये अग्रेसर राहिला आहे. यंदाही गाळप होणाऱ्या उसाला पहिली उचल विनाकपात दोन हजार ५०० रुपये देण्यात येईल, अशी घोषणा या कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी बुधवारी केली.    
हुपती (ता. हातकणंगले) येथील जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम शुभारंभ माजी मंत्री प्रकाश आवाडे व त्यांच्या पत्नी किशोरी आवाडे यांच्या हस्ते गव्हाणीत उसाची मोळी टाकून करण्यात आला.
यावेळी कल्लाप्पाण्णा आवाडे म्हणाले, एकरी उत्पादन वाढीसाठी ऊस उत्पादकांना खत, लागवडी, बियाणे, ठिबक सिंचन आदी योजना पुरविण्याबरोबरच बांधांवर जाऊन कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आहे. गेल्या वीस वर्षांत कोणत्याही कपातीविना ऊस उत्पादकांना अधिकाधिक दर दिला आहे. त्यामुळे दराबाबत सरसकट जवाहरलाही जबाबदार धरणे योग्य नाही.
ऊसदर आंदोलनाचा फटका जवाहर कारखान्याला बसला आहे. वेळेत हंगाम सुरू झाला असता तर आतापर्यंत सव्वा दोन लाख मेट्रिक टनापर्यंत उसाचे गाळप झाले असते, असे प्रकाश आवाडे म्हणाले. ते पुढे म्हणाले की, सध्याच्या चालू हंगामासाठी १७ हजार हेक्टर उसाची नोंद झाली आहे. आपला ऊस जवाहरकडे पाठवून शेतकऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन  ही त्यांनी केले. केन समितीचे सभापती आण्णासाहेब घोटखिंडे व कमल घोटखिंडे यांच्या हस्ते काटा पूजन झाले. उपाध्यक्ष विलास गाताडे यांनी आभार मानले.   प्रारंभी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व ऊस आंदोलनात मृत्यू पावलेल्या दोघा शेतकऱ्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.