त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंबोली गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात मागील सहा महिन्यांच्या कालावधीत २९ बालमृत्यू तर तीन मातांचा मृत्यू झाल्याची बाब येथील वचन लोकशक्ती केंद्राच्यावतीने आरोग्य सेवांवर लोकाधारित देखरेख व नियोजन प्रक्लपांतर्गत आयोजित जनसुनवाईत पुढे आली आहे. बिकट अवस्थेत असणाऱ्या या आरोग्य केंद्रास इतक्या समस्यांचा विळखा पडला आहे की, स्थानिक ग्रामस्थ या ठिकाणी उपचार घेण्याऐवजी त्र्यंबकेश्वरच्या रुग्णालयात जाणे हितावह मानतात. या परिस्थितीत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने मात्र या ठिकाणी माता व बालमृत्यूचे प्रमाण कमी झाल्याचा दावा केला आहे.
अंबोली गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात पार पडलेल्या जनसुनवाईत ग्रामस्थांनी समस्यांचा अक्षरश: पाढाच वाचून दाखविला. या केंद्रात जुलै ते डिसेंबर २०१२ या सहा महिन्यात २९ बालमृत्यू तर तीन मातांचे मृत्यू झाल्याची माहिती यावेळी निदर्शनास आली. वास्तविक पाहता, आरोग्य केंद्रात रिक्त पदांची संख्या मोठी आहे. त्यात जे काही मनुष्यबळ आहे, त्यातील काहींची काम करण्याची मानसिकता नसल्याचे लक्षात येते. काही आरोग्य केंद्राची स्थिती अतिशय बिकट असून त्यात सुधारणा करण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले जात नाहीत. प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावांमध्ये आशा सेविका वेळेवर येत नाही, जननी शिशूसुरक्षा योजनेचे लाभार्थी मानधनापासून अद्याप वंचित आहेत. जननी शिशूसुरक्षा योजनेंतर्गत आवश्यक संदर्भ सेवेसाठी नाशिकच्या केंद्रातील दुरध्वनी उचलले जात नाही, बाळंतपणासाठी अडलेल्या महिलेला एकाही सेवेचा वेळेवर उपयोग होत नाही. एवढेच नव्हे तर, जीवनावश्यकसह अन्य औषधांचा साठा अपुऱ्या प्रमाणात असतो. आशांचे कामकाज व त्याचा मोबदला यांचे योग्य पध्दतीने मूल्यांकन होत नाही, अशा एक ना अनेक वेगवेगळ्या स्वरूपातील तक्रारी जनसुनवाईत करण्यात आल्या. ग्रामस्थांची तीव्र भावना लक्षात घेऊन वैद्यकीय अधिकारी डॉ. मोतीलाल पाटील यांनी त्याबाबत स्पष्टीकरण दिले. माता-बालमृत्यूचे प्रमाण अंशत कमी झाले आहे. त्याकरिता प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने प्रयत्न केले जात आहे. माता मृत्यूसाठी पारंपरिक कारणांचा अधिक असणारा पगडा कारणीभूत असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामस्थांना या आरोग्य केंद्रापेक्षा त्र्यंबकेश्वरच्या रुग्णालयावर अधिक विश्वास आहे. या शिवाय, या उपकेंद्रात येण्यासाठी लागणारा वेळ, वाहतुकीतील अडचणी पाहता त्र्यंबकेश्वर रुग्णालयाला रुग्णांकडून अधिक पसंती दिली जाते. जन्मत: बाळाला दुध वेळेवर मिळत नसल्याने आणि त्यानंतर कुपोषणाचे प्रमाण कायम राहिल्याने बालमृत्यू होत असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले. तसेच औषध साठा पुरेशा प्रमाणात असून जीवनावश्यक औषधे मागविली गेली आहेत. रिक्त पदे लवकरच भरण्यात येणार असून आरोग्य केंद्रात मुलभूत सोई-सुविधा पुरविण्यासाठी निधीची मागणी करण्यात आली आहे. आरोग्य सेवांवर लोकाधारित देखरेख व नियोजन प्रकल्पांतर्गत असलेला निधी नियोजनानुसार खर्च होत असल्याचा दावाही त्यांनी केला. जनसुनवाईत आशा व अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नांवरही चर्चा करण्यात आली. आशा व परिचारीका यांच्यासाठी लवकरच विशेष शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे. जनसुनवाईत त्र्यंबकेश्वर पंचायत समितीचे उपसभापती शांताराम मुळाणे यांच्यासह वचनचे समन्वयक पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. व्ही. आर. जोशी, मॅग्मो वेल्फेअर संस्थेच्या ज्योती पाटील आदी उपस्थित होते. साथीचे भाऊसाहेब आहेर, डॉ. तुषार सूर्यवंशी यांनी ‘पॅनलिस्ट’ म्हणून काम पाहिले.